

वॉशिंग्टन : समजा, एखाद्या व्यक्तीचे हृदय निकामी झाले आणि नवीन हृदय उपलब्ध झाले नाही, तर काय होईल? पण, अमेरिकेतील डॉक्टरांनी विज्ञानाच्या जगात एक कमाल करून दाखवली आहे. मेरीलँड शहरातील 58 वर्षांच्या एका व्यक्तीला, जो मृत्यूच्या जवळ होता, त्याला डुकराचे हृदय प्रत्यारोपित (ट्रान्सप्लांट) करून नवीन जीवन दिले गेले. हा रुग्ण मानवी हृदय प्रत्यारोपणासाठी शारिरीक द़ृष्ट्या अनुकूल नव्हता; पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.
ज्या वैद्यकीय टीमने ही शस्त्रक्रिया केली, त्यांनी गेल्या वर्षीही असेच एक ऑपरेशन केले होते. या रुग्णाने पूर्वी नौदलात सेवा केली होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्याला नवीन जीवन मिळाले आणि तो आता पूर्णपणे ठीक आहे. प्राण्यांचे अवयव मानवांमध्ये बसवण्याच्या प्रक्रियेला ‘झेनो-ट्रान्सप्लांटेशन‘ म्हणतात. सध्या अमेरिकेत 1 लाखाहून अधिक लोक अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत, डॉक्टर जनुकीय बदल केलेल्या डुकरांच्या अवयवांचा वापर करून रुग्णांना नवीन जीवन देण्याचा प्रयत्न करत आहेत.
झेनो-ट्रान्सप्लांटचा सर्वात मोठा धोका हा आहे की, रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती नवीन अवयवाला नाकारू शकते. वैज्ञानिक या समस्येवर मात करण्यासाठी डुकरांच्या अवयवांमध्ये आवश्यक बदल करून त्यांना सुरक्षित बनवत आहेत, जेणेकरून रुग्णांना चांगला उपचार मिळू शकेल. यापूर्वी गेल्या वर्षीही एका रुग्णाला डुकराचे हृदय बसवण्यात आले होते; परंतु ऑपरेशननंतर दोन महिन्यांनी त्याचा मृत्यू झाला होता. यावेळी, लॉरेन्स फॉसेट यांना नवीन हृदय मिळाले.
कारण, ते मानवी हृदयासाठी अपात्र होते. ऑपरेशनपूर्वी त्यांनी सांगितले की, ‘माझ्याकडे हाच एक पर्याय उरला होता, हीच माझी आशा आहे.’ ऑपरेशननंतर डॉक्टरांनी सांगितले की, फॉसेटचे नवीन हृदय पूर्णपणे काम करत आहे आणि त्यांना कोणत्याही मशिनच्या मदतीची गरज नाही. हा उपचार विज्ञान जगतातील एक मोठे यश मानले जात आहे.
वैज्ञानिकांनी अवयव दानासाठी डुकरांना एक आदर्श प्राणी मानले आहे. त्यांच्या अवयवांचा आकार, त्यांची वाढ जलद होणे आणि त्यांची रचना मानवांसाठी योग्य आहे. अलीकडेच, न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयात मेंदू मृत (ब्रेन-डेड) झालेल्या रुग्णाला डुकराची किडनी बसवण्यात आली होती, जी 61 दिवसांपर्यंत कार्यरत राहिली. यापूर्वी 1984 मध्ये एका नवजात बाळाला बबून माकडाचे हृदय बसवण्यात आले होते; पण तो फक्त 20 दिवस जिवंत राहिला. आता चालू असलेल्या संशोधनामुळे अशी आशा निर्माण झाली आहे की, भविष्यात डुकरांच्या अवयवांमुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचवता येतील. हे विज्ञान आणि मानवतेसाठी एक मोठी उपलब्धी ठरत आहे.