दक्षिण अमेरिकेत 14,500 वर्षांपूर्वी मानवाचे स्थलांतर
वॉशिंग्टन : गेल्या हिमयुगात, आशियातून बेरिंग लँड ब्रिजवरून अमेरिकेत स्थलांतर करणार्या मानवांनी तीन महत्त्वाचे जनसंख्या विभाजने अनुभवली, असे एका नवीन जनुकीय अभ्यासातून समोर आले आहे. हा स्थलांतराचा प्रवास हा आफ्रिकेबाहेर झालेला सर्वात दीर्घ मानवी प्रवास होता आणि तो 14,500 वर्षांपूर्वी पॅटागोनियामध्ये पोहोचला होता. याचा अर्थ दक्षिण अमेरिकेत 14,500 वर्षांपूर्वी मानवाचे स्थलांतर घडले.
15 मे रोजी ‘सायन्स’ या नामवंत जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमने 139 वेगवेगळ्या जमातींच्या 1,537 मानव जीनोम्सचे विश्लेषण केले. या विश्लेषणातून अमेरिकेतील मूळ वंशजांचे जनुकीय वैशिष्ट्य आणि त्यांच्या स्थलांतराच्या टप्प्यांचे आकलन करण्यात आले. ‘अनेक मूळ आदिवासी जमाती लहान असून त्यांच्या जनुकीय रचनामध्ये अत्यल्प विविधता आढळते,’ असे या अभ्यासाच्या सहलेखिका डॉ. हाय लिम किम यांनी सांगितले. त्या सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत जनसंख्या जीनोमिक्समध्ये प्राध्यापक आहेत. GenomeAsia 100K या प्रकल्पातून संकलित करण्यात आलेल्या जीन माहितीच्या आधारे त्यांनी ही तपशीलवार मांडणी केली.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पहिलं जनसंख्या विभाजन 26,800 ते 19,300 वर्षांपूर्वीच्या ‘लास्ट ग्लेशियल मॅक्सिमम’दरम्यान घडलं, जेव्हा मूळ अमेरिकन वंशज उत्तर युरेशियन जनतेपासून वेगळे झाले. या कालावधीतील अमेरिकेत मानवी अस्तित्वाच्या खुणा न्यू मेक्सिकोतील ‘व्हाईट सँडस्’ येथे सापडलेल्या पावलांच्या ठशांमधून अधोरेखित होतात. दुसरे महत्त्वाचे विभाजन 17,500 ते 14,600 वर्षांपूर्वी घडले, जेव्हा उत्तर अमेरिकेतील मूळ लोकसंख्या दोन भागांमध्ये विभागली आणि काही लोक दक्षिणेकडे गेले. त्या गटातूनच 13,900 वर्षांपूर्वी चार प्रमुख जनुकीय वंश तयार झाले.
चाको अमेरिंडियन (पुर्वज पुएब्लो लोक), अॅमेझॉनियन, अँडियन आणि पॅटॅगोनियन वंश. ‘ही तारीख पुरातत्त्वीय नोंदींशी जुळते,’ असं किम म्हणाल्या. पॅटागोनियामध्ये सुमारे 14,500 वर्षांपूर्वी लोकांचे अस्तित्व होते, हे उत्खननांतून स्पष्ट झाले आहे. या स्थलांतराच्या प्रवासात भौगोलिक अडथळ्यांमुळे आणि नंतर युरोपीय वसाहतवादाच्या धक्क्यामुळे या लोकांच्या जनुकीय विविधतेमध्ये घट झाली. परिणामी, आजच्या काळात या जमाती लहान, विशिष्ट वंशीय आणि दुर्बळ जनुकीय पायाभूत रचनेच्या आहेत. हा अभ्यास प्राचीन मानव स्थलांतराच्या आणि आजच्या मूळ जमातींच्या आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक प्रश्नांवर प्रकाश टाकतो आणि अशा अनवट इतिहासाचा वैज्ञानिक द़ृष्टिकोनातून मागोवा घेणारा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

