Molluscum Contagiosum Virus | ‘हा’ विषाणू एक लाख वर्षांपासून घेऊन फिरतोय मानवी ‘जीन’

Molluscum Contagiosum Virus |
Molluscum Contagiosum Virus | ‘हा’ विषाणू एक लाख वर्षांपासून घेऊन फिरतोय मानवी ‘जीन’
Published on: 
Updated on: 

लंडन : आपल्या शरीरातील डीएनए हा सहसा एका पुस्तकासारखा मानला जातो, ज्यामध्ये शरीराच्या कार्याची संपूर्ण अनुवंशिक माहिती नोंदवलेली असते; मात्र या पुस्तकात काही असे भाग आहेत, जे एकाच ठिकाणी स्थिर राहत नाहीत. ते डीएनएच्या आत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. शास्त्रज्ञ यांना ‘जंपिंग जीन’ असे म्हणतात. कॉर्नल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एका मानवी अनुवंशिक घटकाचा शोध लावला असून, या संशोधनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘बीसी २००’ नावाचा हा जीन एकीकडे मेंदूच्या पेशींमध्ये आढळतो आणि शरीराच्या सामान्य जैविक प्रक्रियेत भूमिका बजावतो, तर दुसरीकडे डीएनएच्या आत स्वतःची जागा बदलण्याची क्षमताही यात कायम आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याची कथा केवळ मानवापुरती मर्यादित नाही. शास्त्रज्ञांना हाच अनुवंशिक घटक ‘मोलस्कम कॉन्टेजिओसम व्हायरस’ (Molluscum Contagiosum Virus) या त्वचेला संसर्ग करणाऱ्या एका पॉक्सव्हायरसमध्येही सापडला आहे. तो त्याच्या शरीरात एक लाख वर्षांपासून आहे हे विशेष!

संशोधकांच्या मते, बीसी२०० चे मूळ हे सुमारे

४ कोटी वर्षे जुन्या ‘जंपिंग जीन’शी जोडलेले आहे. मानवी शरीरात उपस्थित असलेला जीन हा सहसा डीएनएचा असा भाग मानला जातो, जो शरीराच्या पेशींना आवश्यक सूचना देतो; मात्र आता शास्त्रज्ञांना असा एक व्हायरस सापडला आहे जो मानवाशी संबंधित जीन तब्बल एक लाख वर्षांपासून स्वतःसोबत घेऊन फिरत आहे. हा जीन केवळ व्हायरसच्या आतच अस्तित्वात नाही, तर आजच्या काळातही डीएनएमध्ये स्वतःची जागा बदलण्याची क्षमता ठेवतो. कॉर्नल युनिव्हर्सिटीचे जीवशास्त्रज्ञ सेड्रिक फेशोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बीसी२०० नावाचा हा जीन ‘मोलस्कम कॉन्टेजिओसम व्हायरस’ (MCV) मध्ये शोधून काढला. हा पॉक्सव्हायरस कुळातील व्हायरस आहे, जो केवळ मानवांना संक्रमित करतो आणि त्वचेवर लहान पुरळ किंवा गाठी निर्माण करतो. हा संसर्ग सामान्यतः सौम्य असतो आणि काही महिन्यांत बरा होतो. प्रसिद्ध ‘सायन्स’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, बीसी२०० मध्ये दोन अशी वैशिष्ट्ये एकत्र आढळली आहेत जी यापूर्वी कोणत्याही मानवी जीनमध्ये अशा प्रकारे कधीही पाहिली गेली नव्हती. बीसी२०० हा प्रामुख्याने न्यूरॉन्स म्हणजेच मेंदूच्या ज्या पेशी एकमेकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचे काम करतात, त्यात आढळतो. मात्र याची सुरुवात लाखो वर्षांपूर्वी एका ‘ट्रान्सपोसॉन’पासून झाली होती. ट्रान्सपोसॉन हा डीएनएचा असा भाग असतो, जो आपल्या मूळ स्थानावरून निघून जीनोममध्ये (शरीराच्या संपूर्ण अनुवंशिक नकाशात) इतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन जोडू शकतो. याच कारणामुळे त्यांना सोप्या भाषेत ‘जंपिंग जीन’ म्हटले जाते. जेव्हा असे ट्रांसपोसॉन एखाद्या जीनच्या आत जाऊन डीएनएचा भाग जोडतात, तेव्हा त्या जीनचे सामान्य कार्य प्रभावित होऊ शकते आणि अनेकदा यामुळे आजारही उद्‍भवू शकतात. अध्ययनाचे वरिष्ठ लेखक सेड्रिक फेशोटे यांच्या मते, सामान्यतः जेव्हा एखाद्या ट्रांसपोसॉनपासून नवीन जीन तयार होतो आणि तो शरीराच्या एखाद्या कार्यासाठी वापरला जाऊ लागतो, तेव्हा वेळेनुसार त्याची इकडून तिकडे जाण्याची (जागा बदलण्याची) क्षमता संपुष्टात येते. मात्र या प्रकरणात मानवी शरीरातील आणि व्हायरसमधील बीसी २०० ची क्षमता अजूनही टिकून असल्याने संशोधकही चक्रावून गेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news