Human Fridge | कामगारांना उन्हापासून वाचवण्यासाठी बनवला ‘माणसांचा फ्रीज’

Human Fridge |
Human Fridge | कामगारांना उन्हापासून वाचवण्यासाठी बनवला ‘माणसांचा फ्रीज’
Published on
Updated on

टोकियो : भीषण उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी एखाद्या माणसाला थेट फ्रीजमध्ये जाऊन बसावे लागेल, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? दरवर्षी वाढणाऱ्या तापमानामुळे आणि कडक उन्हामुळे लोकांचे हाल होत आहेत. याच समस्येवर उपाय म्हणून तंत्रज्ञानात नेहमीच पुढे असणाऱ्या जपानने आता चक्क ‘माणसांचा फ्रीज’ (Human Refrigerator) तयार केला आहे. ऐकायला हे जरी विचित्र आणि धक्कादायक वाटत असले, तरी जपानी शास्त्रज्ञांनी ही अनोखी संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

कडक उन्हात काम करणाऱ्या कामगारांना हा ह्युमन फ्रीज अवघ्या ५ मिनिटांत प्रचंड थंडावा देतो. तसेच फक्त ५ ते १० मिनिटांच्या आत शरीराचे तापमान वेगाने कमी करतो. या उपकरणाची निर्मिती जपानमधील प्रसिद्ध ‘ट्रस्को नाकायामा कॉर्पोरेशन’ या कंपनीने केली असून, याचे अधिकृत नाव ‘डो रेमन बॉक्स’ असे ठेवण्यात आले आहे. हे डिव्हाईस प्रामुख्याने बांधकाम क्षेत्र, फॅक्टरी, गोदामे आणि कडक उन्हात काम करणाऱ्या मजूर व कर्मचाऱ्यांसाठी डिझाईन केले गेले आहे, जेणेकरून त्यांना ‘हीटस्ट्रोक’ म्हणजेच उष्माघातापासून वाचवता येईल. हा माणसांचा फ्रीज म्हणजे प्रत्यक्षात एक सिंगल-पर्सन (एका व्यक्तीसाठीचा) स्टेनलेस स्टीलचा केबिन आहे.

वापरकर्त्याला या केबिनच्या आत जाऊन एका खुर्चीवर बसावे लागते. या बूथच्या आतील तापमान साधारण १५ अंश सेल्सिअस राखले जाते. व्यक्ती आत बसताच तिच्या डोक्यावर, मानेवर आणि पाठीवर ५ अंश सेल्सिअस तापमानाचा थंड हवेचा वेगवान झोत सोडला जातो. मान आणि डोके हे मानवी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतात. त्यामुळेच सामान्य एसीच्या तुलनेत या फ्रीजमध्ये शरीर अत्यंत वेगाने थंड होते. कंपनीच्या दाव्यानुसार, शरीराचे तापमान सामान्य करण्यासाठी ५ ते १० मिनिटांचा वेळ पुरेसा आहे.

मात्र, अतिथंड हवेमुळे त्रास होऊ नये म्हणून सुरक्षेसाठी या फ्रीजची कूलिंग टाइमिंग मर्यादा कमाल २० मिनिटांवर सेट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा केबिन बनवण्याची कल्पना फ्रीजमधील अन्नपदार्थ ठेवणाऱ्या ‘फ्रोजन फूड वेंडिंग मशिन’च्या कूलिंग तंत्रज्ञानावरून सुचली आहे. इंजिनिअर्सनी त्याच तंत्रज्ञानात बदल करून ते माणसांच्या वापरासाठी योग्य बनवले. हा ह्युमन फ्रीज चालवण्यासाठी कोणत्याही मोठ्या पायाभूत सुविधांची गरज पडत नाही. हा यंत्रमानव सामान्य १००-व्होल्टच्या पॉवर सप्लायवर चालतो. तसेच, या केबिनला खाली चाके बसवण्यात आली आहेत, ज्यामुळे ते कोणत्याही वर्कसाईटवर किंवा कामाच्या ठिकाणी सहज हलवता येऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news