

नवी दिल्ली : अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका प्रयोगशाळेत उंदीर नेहमीप्रमाणेच त्यांच्या पिंजऱ्यात इकडे तिकडे फिरत आहेत; मात्र त्यांच्या मेंदूमध्ये लाखो कार्यरत मानवी न्यूरॉन्स (चेतापेशी) काम करत आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी अनुवांशिकदृष्ट्या (जिनेटीकली इंजिनिअर्ड) बदल केलेल्या अशा उंदरांच्या मेंदूत प्रयोगशाळेत वाढवलेल्या मानवी पेशींचे यशस्वी रोपण केले आहे, ज्यांच्या मेंदूचा काही भाग जन्मतःच काढून घेण्यात आला होता. या अभ्यासानुसार, या ‘एलियन-कॉर्टिकल उंदरांच्या’ माध्यमातून सिझोफ्रेनिया, सेरेब्रल पाल्सी आणि डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) यांसारख्या मेंदूच्या आजारांचा अभ्यास करण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे.
हा प्रयोग नेमका कसा केला?
संशोधकांनी सुरुवातीला उंदरांमध्ये जनुकीय बदल करून त्यांची निर्मिती केली, जेणेकरून ते मेंदूच्या बाहेरील भागाशिवाय (सेरेब्रल कॉर्टेक्स आणि हिप्पोकैम्पस) जन्माला येतील. हे भाग प्रामुख्याने हालचाली, शिकणे आणि स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचे असतात. उंदीर अवघ्या दोन दिवसांचे असताना, संशोधकांनी त्यांच्या मेंदूच्या रिकाम्या पोकळीत मानवी ‘ऑर्गनाइडस्’ (मिनिएचर मॅसेस ऑफ सेल्स) टोचले. स्टेम सेल किंवा ट्यूमरच्या पेशींपासून मानवी अवयवांची नक्कल करण्यासाठी प्रयोग शाळेत हे छोटे गोळे तयार केले जातात. निरोगी दात्यांच्या स्टेम सेलपासून तयार केलेल्या या प्रत्येक ऑर्गनाईडमध्ये सुमारे १,००,००० मानवी पेशी होत्या. एकूणच, संशोधकांनी उंदरांच्या मेंदूमधून सुमारे १४ दशलक्ष (१ कोटी ४० लाख) मज्जातंतू काढून त्यात सुमारे ४ दशलक्ष (४० लाख) मानवी मज्जातंतू जोडले. हा कोणताही मेंदू प्रत्यारोपण प्रयोग नसून, हे उंदीर मानवासारखा विचार करणारे नाहीत, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
उंदरांवर याचा काय परिणाम झाला?
अवघ्या तीन महिन्यांत मानवी ऊती (टिश्यूज) उंदरांच्या मेंदूमध्ये सुमारे पाच पटीने वाढल्या. त्यामुळे रक्तपुरवठ्याशी जोडून ९० टक्क्यांहून अधिक पोकळी भरून काढली. मानवी ऊतींनी मेंदूचा अर्धा भाग व्यापला असला, तरी हे उंदीर सामान्यपणे चालत होते आणि आवाज काढत होते. गुंतागुंतीच्या (मेझ टेस्ट) चाचणीदरम्यान मानवी पेशी असलेले उंदीर इतर उंदरांपेक्षा अधिक हुशार ठरले, ज्यामुळे मानवी पेशींमुळे त्यांची बुद्धिमत्ता वाढल्याचे दिसून आले.
मानवी न्यूरॉन्स उंदरांमध्ये का रोपण केले?
मानवी मेंदूमध्ये सुमारे ८६ अब्ज मज्जातंतू असतात, जे एकमेकांशी जोडलेले असतात. मानवी मेंदूच्या उच्च जटिलतेमुळे (कॉम्प्लेक्सिटी) जिवंत मेंदूच्या ऊतींवर संशोधन करणे कठीण जाते. यामुळे वैज्ञानिक अनेक वर्षांपासून प्रयोगशाळेत मानवी मज्जातंतूंचे छोटे गोळे (ऑर्गनॉइडस्) वाढवत आहेत. परंतु, ते जिवंत मेंदूच्या वातावरणाशिवाय अपूर्ण असतात. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मानसोपचार विभागाचे प्राध्यापक सर्गियू पास्का यांच्या मते, या संशोधनामुळे मानवी मेंदूच्या कार्याचा अभ्यास करणे सोपे होईल, ज्याचा अभ्यास करणे पूर्वी अत्यंत कठीण होते.