

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अॅपालॅशियन पर्वतरांगांमध्ये लिथियमचा प्रचंड आणि न वापरलेला साठा असल्याचा दावा अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (णडॠड) च्या नवीन संशोधनात करण्यात आला आहे. हा साठा इतका अथांग आहे की, यातून तब्बल 500 अब्ज सेलफोन, 180 अब्ज लॅपटॉप किंवा 130 दशलक्ष (13 कोटी) इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटर्या तयार केल्या जाऊ शकतात.
या पर्वतीय प्रदेशात 2.5 दशलक्ष टन (23 लाख मेट्रिक टन) लिथियम उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. जर अमेरिकेची लिथियमची आयात गेल्या वर्षीच्या पातळीवरच राहिली, तर पुढील 328 वर्षे अमेरिकेला इतर कोणत्याही देशाकडून लिथियम आयात करण्याची गरज पडणार नाही. या डोंगराळ भागात खाणकाम केल्यास अमेरिकेचे चीन, अर्जेंटिना आणि चिलीसारख्या देशांवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. मात्र, या खाणकामामुळे पर्यावरणावर काय परिणाम होतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अमेरिकेच्या पूर्वेकडील अलाबामापासून ते मेन राज्यापर्यंत पसरलेला हा लिथियमचा साठा ‘पेग्माटाईटस्’ नावाच्या अत्यंत खडबडीत आणि जाड कणांच्या खडकांमध्ये दडलेला आहे. उत्तर आणि दक्षिण अॅपालॅशियन प्रदेशावरील दोन नवीन अभ्यासांमध्ये भूगर्भशास्त्रज्ञांनी ही माहिती दिली आहे. 18 एप्रिल रोजी ‘नॅचरल रिसोर्सेस रिसर्च’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या उत्तर अॅपालॅशियन विश्लेषणाचे सहलेखक आणि णडॠड चे भूगर्भशास्त्रज्ञ क्रिस्टोफर होल्म-डेनोमा यांनी सांगितले की, ‘या प्रदेशातील लिथियम संसाधनांचे णडॠड कडून झालेले हे पहिलेच मूल्यमापन आहे.
देशभरातील पेग्माटाईटस्, खार्या पाण्याच्या विहिरी, सुकलेले तलाव आणि प्राचीन ज्वालामुखीच्या क्षेत्रांमधील लिथियम साठ्यांचा शोध घेण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे.’ संशोधकांच्या मते, उत्तर अॅपालॅशियन प्रदेशात, ज्यामध्ये मेन, न्यू हॅम्पशायर, व्हरमाँट, न्यूयॉर्क, मॅसॅच्युसेटस्, कनेटिकट, र्होड आयलंड, पेनसिल्व्हेनिया, न्यू जर्सी आणि डेलावेर या राज्यांचा समावेश होतो, सुमारे 9,90,000 टन (9,00,000 मेट्रिक टन) लिथियम साठा आहे. हा अंदाज लावण्यासाठी संशोधकांनी भूगर्भीय नकाशे, भौगोलिक-रासायनिक आणि भौगोलिक-भौतिक डेटा, खनिजांच्या नोंदी आणि या प्रदेशाच्या भूगर्भीय इतिहासाचा सखोल अभ्यास केला. तसेच, जागतिक लिथियम पेग्माटाईटस्च्या डेटाच्या आधारे एका मॉडेलचा वापर करून या साठ्याचा आकार निश्चित केला आहे.