Mysterious Goat : मनालीमध्ये रहस्यमय बकरी पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी

हिमाचल प्रदेशातील जोगनी माता मंदिरातील कथित चमत्काराची चर्चा
Mysterious Goat
मनालीमध्ये रहस्यमय बकरी पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी
Published on
Updated on

मनाली : आपल्याकडे लोकांना चमत्कारांविषयी भलतेच आकर्षण असल्याचे दिसते. त्यामुळे चमत्कारिक गोष्टींनाही तात्काळ प्रसिद्धीही मिळते. आता अशीच एक ‘चमत्कारिक’ ठरवली गेलेली बकरी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. जर कोणी तुम्हाला सांगितले की, मंदिराच्या परिसरात एक बकरी दररोज दिसते; मात्र तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला की ती अचानक डोळ्यांसमोरून गायब होते तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का? हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील झीरी येथील जोगनी माता मंदिरातील अशा एका बकरीची कथित रहस्यमय घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

हिमाचल प्रदेशला ‘देवभूमी’ म्हणून ओळखले जाते. येथील मंदिरं, धार्मिक परंपरा आणि स्थानिक श्रद्धांना मोठे महत्त्व आहे. अशातच कुल्लू जिल्ह्यातील झीरी येथील जोगनी माता मंदिर परिसरात गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून एक बकरी सातत्याने दिसत असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिक आणि मुलांच्या म्हणण्यानुसार ही बकरी जवळपास तीन महिन्यांपासून मंदिर परिसरातील ठराविक ठिकाणी दिसत आहे. सामान्यतः पाळीव किंवा भटक्या जनावरांची हालचाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असते. मात्र, या बकरीची ठराविक पद्धतीने होणारी ये-जा अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरली आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार, ही बकरी अनेकदा संध्याकाळी साधारण ७ वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरात येते. त्यानंतर पहाटे ५ वाजताच्या आसपास पुन्हा एका ठराविक ठिकाणी जाऊन बसते असा दावा करण्यात आला आहे.

दिवसभरही ही बकरी मंदिराच्या आसपास फिरताना आणि परिसराला चक्कर मारताना दिसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही भाविक या घटनेकडे केवळ योगायोग म्हणून पाहत नाहीत तर तिचा संबंध जोगनी मातेशी जोडून पाहत आहेत. या बकरीच्या आहाराबाबतही वेगवेगळे दावे समोर येत आहेत. काही स्थानिकांच्या मते, ही बकरी रात्रीच्या वेळी गवत किंवा चारा खाते. तर काही प्रत्यक्षदर्शी असे सांगतात की, त्यांनी या बकरीला कधी काही खाताना किंवा पाणी पिताना पाहिलेलेच नाही. यामुळे बकरीच्या वर्तनाबाबत आणखी प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाला रहस्यमय वळण देणारा दावा म्हणजे बकरी अचानक गायब होत असल्याचा. रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी दूरून बकरीला पाहिले. मात्र, तिच्याजवळ जाण्याचा किंवा तिला तिथून आणण्याचा प्रयत्न केला असता ती क्षणार्धात नजरेआड झाल्याचे काहींचे म्हणणे आहे. या दाव्यामुळे सोशल मीडियावर या बकरीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काहीजण याला मंदिराशी संबंधित एखादी अलौकिक घटना मानत आहेत, तर काहीजण याकडे केवळ प्राण्याच्या नैसर्गिक वर्तनाच्या दृष्टीने पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news