Hubble Space Telescope | ‘हबल’ दुर्बिणीने टिपले ताऱ्यांच्या निर्मिती आणि विनाशचक्राचे दृश्य

 Hubble Space Telescope |
Hubble Space Telescope | ‘हबल’ दुर्बिणीने टिपले ताऱ्यांच्या निर्मिती आणि विनाशचक्राचे दृश्य
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अवकाशातील ढगांमध्ये एक भलामोठा खड्डा पडल्यासारखे दिसणारे हे दृश्य प्रत्यक्षात अत्यंत गुंतागुंतीच्या अंतराळ घडामोडींचे प्रतीक आहे. ‘हबल स्पेस टेलिस्कोप’ने टिपलेल्या एका नवीन नेत्रदीपक छायाचित्रात ताऱ्यांच्या विनाश आणि निर्मितीचे एक नयनरम्य चक्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यामध्ये ताऱ्यांची एक पिढी आपल्याच जन्मस्थानाला नष्ट करत असताना, एकाच वेळी दुसऱ्या नवीन पिढीच्या ताऱ्यांच्या निर्मितीस मदत करताना दिसत आहे.

‘LHA 120-N44’ (थोडक्यात N44) नावाची हा तेजोमेघ (नेब्युला) आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेची परिक्रमा करणाऱ्या ‘लार्ज मॅगेलॅनिक क्लाऊड’ या छोट्या आकाशगंगेत स्थित आहे. हा तेजोमेघ पृथ्वीपासून तब्बल १,६०,००० प्रकाशवर्षे दूर असून, डोराडो तारकासमूहात दिसून येते. हा अथांग आणि पोकळ दिसणारा प्रदेश तब्बल २१० बाय १४० प्रकाशवर्षे एवढ्या महाकाय क्षेत्रात पसरलेला आहे. (तुलना करायची झाल्यास, आपल्या सूर्यमालेच्या सर्वात जवळ असलेली ‘अल्फा सेंटॉरी’ ही तारा प्रणाली केवळ ४.४ प्रकाशवर्षे अंतरावर आहे.) या तेजोमेघाच्या मध्यभागी असलेल्या अत्यंत उष्ण आणि महाकाय ताऱ्यांच्या समूहाने ही अवाढव्य पोकळी तयार केली आहे.

महाकाय खड्ड्यासारख्या दिसणाऱ्या या रूपामुळे या तेजोमेघाला ‘सुपरबबल’ म्हणून ओळखले जाते. हे महाकाय तारे एका बाजूला विनाशाचे कारण ठरत आहेत. ज्याप्रमाणे आपल्या सूर्याच्या ‘सौर वाऱ्यांमुळे’ पृथ्वीवर ध्रुवीय प्रकाश (ऑरोरा) दिसतो आणि सूर्यमालेची हद्द ठरते, त्याचप्रमाणे या ताऱ्यांमधून निघणारे प्रचंड शक्तिशाली वारे सभोवतालचे द्रव्य अंतराळात फेकून देतात. त्याच वेळी यातील सर्वात महाकाय ताऱ्यांचा शेवटी ‘सुपरनोव्हा’ म्हणून महाविस्फोट होतो, ज्यामुळे सभोवतालचा वायू आणखी दूर लोटला जातो. या जुन्या आणि नवीन ताऱ्यांच्या एकत्रित विकिरणांमुळेच या तेजोमेघात अशा प्रकारची भव्य पोकळी तयार होते, जी नव्या ताऱ्यांच्या जन्मास चालना देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news