Household Robots | घरकामासाठी ह्युमनॉइड रोबोंचा वापर कसा होईल ?

 Household Robots |
Household Robots | घरकामासाठी ह्युमनॉइड रोबोंचा वापर कसा होईल ?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : कपड्यांच्या घड्या घालणारा, भांडी घासणारा किंवा व्हॅक्यूम क्लीनरने घर साफ करणारा मानवाकृती (ह्युमनॉइड) रोबो एकेकाळी एखाद्या काल्पनिक कथेचा भाग वाटायचा. परंतु, आता रोबोटिक्स कंपन्या दैनंदिन वातावरणात सहज वावरू शकतील आणि घरातील कामे हाताळू शकतील, अशी यंत्रे बनवण्यासाठी शर्यतीत उतरल्या आहेत. त्यामुळे एखादा रोबो आपली घरकामे करेल ही शक्यता आता सत्यात उतरताना दिसत आहे.

मात्र, रोबोट्स ही कामे करू शकतात म्हणजे लोक त्यांना लगेच आपल्या घरात स्वीकारायला तयार आहेत, असे नाही. नुकताच एका विज्ञान संकेतस्थळाने वाचकांचा याबाबत एक सर्व्हे घेतला होता. ‘‘तुम्हाला तुमच्या घरातील कामांसाठी ह्युमनॉइड रोबो आवडेल का?’’ असा प्रश्न यात विचारण्यात आला होता. या सर्वेक्षणाचे निकाल रोबोटिक कामगारांबद्दल लोकांच्या मनात किती आकर्षण आहे हे स्पष्ट करतात. १५ सप्टेंबरपर्यंत ६०० हून अधिक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली, ज्यामध्ये ४२ टक्के लोकांनी ‘‘होय, माझी सर्व कामे रोबोने करावीत’’ हा पर्याय निवडला.

हीच मानसिकता कमेंट्स विभागातही दिसून आली. एका वाचकाने लिहिले, ‘‘मला नक्कीच आवडेल, पण रोबोने केलेल्या कामाला माझी पत्नी मंजुरी देईल की नाही याबद्दल मला शंका आहे.’’ यावर दुसऱ्या वाचकाने उत्तर दिले, ‘‘तिचे बरोबर आहे. तिची घरातील सर्व जबाबदारी एक वर्षासाठी तुम्ही स्वतः सांभाळा आणि मग सांगा.’’ दुसरीकडे, ३६ टक्के वाचकांनी याच्या अगदी उलट उत्तर दिले. ‘‘नाही, माझी भांडी (किंवा माझा डेटा) सांभाळण्यासाठी माझा यावर विश्वास नाही.’’ ह्युमनॉइड रोबोंना त्यांच्या सभोवतालच्या वातावरणातून शिकवून कामे आणि हालचाली शिकवल्या जातात. सध्या हे तंत्रज्ञान प्राथमिक टप्प्यात असल्याने काही वेळेस रोबोंकडून गंमतीशीर चुका होतात. प्रायव्हसीच्या (गोपनीयता) चिंतेपेक्षा सध्या रोबोंच्या या यांत्रिक दोषांवरच जास्त चर्चा होत आहे. इतर काही वाचकांनीही रोबोंच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केली.

एका वाचकाने लिहिले, ‘‘मला नाही वाटत की, रोबो घरातील धूळ काढण्यासारखी बारीक कामे सफाईदारपणे करू शकतील. कदाचित व्हॅक्यूमिंग करू शकतील; पण फर्निचर बाजूला सरकवून काम करताना ते संथ आणि अस्ताव्यस्त ठरतील.’’ या वाचकाने पुढे लादी पुसणे, फर्निचर सरकवणे आणि कोणती भांडी डिशवॉशरमध्ये टाकावीत व कोणती नाही हे रोबोला ओळखता येईल का, यावरही प्रश्न उपस्थित केला. ‘‘कदाचित हे रोबो घरातील कुंड्या आणि झाडांची देखभाल उत्तम प्रकारे करू शकतील,’’ असे सांगत वाचकाने पुढे लिहिले, ‘‘ओलावा मोजणारे यंत्र (मॉइश्चर मीटर) आणि वनस्पतीशास्त्राचा प्रचंड डेटाबेस असलेला रोबो मोठ्या व्यावसायिक रोपवाटिकांमध्ये (नर्सरी) झाडांना पाणी देण्याचे काम माणसांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल...’’

logo
Pudhari News
pudhari.news