

न्यूयॉर्क : सध्या ज्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात नेहमी पाहत असतो, त्यामध्ये दुकानात वस्तूची किंमत तपासण्यासाठी वापरण्यात येणार्या बारकोडचाही समावेश आहे. त्याचा शोध कसा लागला हे सांगणारी गोष्ट रंजक आहे.
एका हुशार वैज्ञानिकाला सहज सुचलेल्या एका कल्पनेतून साकारलेल्या शोधाची ही गोष्ट आहे. हा शोध लावणार्या व्यक्तीचे नाव होते जोसेफ वूडलँड. त्यावेळी म्हणजेच 1948 साली तो अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये डेक्स्टर इन्स्टिट्यूटला पदवीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी होता. एकदा त्याच्या ओळखीच्या स्थानिक किराणा दुकानदाराने जोसेफ वूडलँडला एक आव्हान दिले. हे आव्हान होते ग्राहकाने दुकानातून वस्तू घेतल्यानंतर त्याचे पैसे घेणे व नोंद ठेवण्याची किचकट व वेळखाऊ प्रक्रिया सोपी आणि जलद करून दाखवण्याचे.
पैसे घेऊन विकलेल्या वस्तूंची नोंद ठेवण्याची एक नवी स्वयंचलित पद्धत विकसित करून दाखव, असे आव्हानच या दुकानदाराने जोसेफ वूडलँडला दिले. याचदरम्यान तो मायामीमध्ये आपल्या आजी - आजोबांना भेटायला आला होता. मायामीतील समुद्र किनार्यावर बसून तो तिथल्या वाळूमध्ये आपल्या हाताच्या बोटांनी आकृत्या काढू लागला. अशा आकृत्या वाळूत काढत असतानाच त्याची नजर समोरच्या खाडीतील चढ - उताराकडे गेली आणि त्याला एक कल्पना सुचली. ज्याप्रमाणे एखादा संदेश पाठवण्यासाठी मोर्सकोडमध्ये टिंब आणि रेषांचा वापर केला जातो, त्याप्रमाणे माहिती जमवून तिची वाहतूक करण्यासाठी अशा मी मातीवर काढलेल्या रेषा वापरता येतील.
वर्तुळांचे चक्र असलेले बुल्स आयचे चिन्हं दुकानातील ठरावीक उत्पादनाची माहिती दर्शवण्यासाठी वापरता येईल. कोडमध्ये चिन्हाच्या रूपात काढलेल्या उत्पादनावरील ही माहिती वाचून त्यावर प्रक्रिया करणारे एखादे यंत्र दुकानात बसवता येईल, असा विचार जोसेफ वूडलँडला मायामीच्या किनार्यावर सुचला. वूडलँडला सुचलेली कल्पना तशी तर चांगली होती; पण ती प्रत्यक्षात उतरवता येईल यासाठीचे तंत्रज्ञान तेव्हा अजून विकसित झालेले नव्हते. बारकोडच्या शोधाबरोबरच तो बारकोड वाचू शकेल, असा संगणक, स्कॅनर आणि लेझरही गरजेचा होता. हळूहळू संगणक आणखी प्रगत होत गेले आणि लेझर तंत्रज्ञान अस्तित्वात आले तेव्हा ही कल्पना आता प्रत्यक्षात उतरवणे शक्य होणार होते. मध्यंतरी कोडला स्कॅन करू शकेल, अशा यंत्राचा स्वतंत्र शोध लागला.
लेझरचे तंत्रज्ञान थिओडोर मेमन या शास्त्रज्ञाने विकसित केले होते. 1950 च्या दशकात डेव्हिड कॉलिन्स या अभियंत्याने रेल्वेगाडीच्या डब्ब्यांवर अशा जाड आणि पातळ रेषा असलेले कोड बसवले आणि ते कोड वाचू शकतील, असे स्कॅनर रेल्वेरूळावर लावले. यातून मालगाड्यांमध्ये टाकल्या जाणार्या मालाची नोंदणी केली जाऊ लागली. 1970 च्या दशकात जॉर्ज लॉरर या ‘आयबीएम’मधील अभियंत्याने ‘बुल्स आय’ला पर्याय म्हणून आणखी एक नवा कोड विकसित केला, जो आयताकृतीत होता. हा आयताकृती कोड ‘बुल्स आय’पेक्षा प्रभावी होता. दुकानातील बीनबॅग्सवर हे कोड लावून मग त्यांची विक्री यातून केली गेली. समुद्रकिनारी बसून वूडलँडने रचलेली परिकल्पना आता प्रत्यक्षात उतरली होती.
अमेरिकेतील दुकानदार व उत्पादकांचे युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड (यूपीसी) वर एकमत झाले आणि अमेरिकेत एकसमान बारकोड वापरण्याचा मार्ग मोकळा झाला. 1974 सालच्या जून महिन्यात अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ट्रॉय शहरात असलेल्या मार्श सुपरमार्केटमधील काऊंटरवर बारकोड पहिल्यांदा अधिकृतपणे वापरला गेला. या सुपरमार्केटमध्ये काम करणार्या शेरॉन बुचॅनन या 31 वर्षीय कर्मचार्याने पहिल्यांदा रिंगलेच्या 50 ज्यूसी फ्रूट चिविंग गमच्या पाकिटावरील बारकोड लेझर स्कॅनरवर स्कॅन करून त्यावर आपोआप उमटलेली 67 सेंट्ची किंमत नोंदवून इतिहास रचला.