First Steamboat | जेव्हा वाफेवर चालणार्‍या बोटीने जलवाहतुकीची व्याख्या बदलली!

First Steamboat |
First Steamboat | जेव्हा वाफेवर चालणार्‍या बोटीने जलवाहतुकीची व्याख्या बदलली!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : इतिहासाच्या पानात 11 फेब्रुवारी हा दिवस एका अशा क्रांतीच्या नावे नोंदवला गेला आहे, ज्याने जलवाहतुकीची संपूर्ण व्याख्याच बदलून टाकली. तब्बल 217 वर्षांपूर्वी, म्हणजेच 11 फेब्रुवारी 1809 रोजी अमेरिकन शास्त्रज्ञ रॉबर्ट फुल्टन यांनी वाफेवर चालणार्‍या बोटीचे (स्टीमबोट) पेटंट मिळवले होते.

ज्या काळात नद्यांच्या मार्गाने व्यापार आणि प्रवास करणे अत्यंत आव्हानात्मक मानले जात होते, त्या काळात फुल्टन यांचा हा शोध एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता. फुल्टन यांच्या शोधापूर्वी नौका वल्ह्यांच्या मदतीने चालवल्या जात असत. ही प्रक्रिया केवळ संथच नव्हती, तर नाविकांसाठी अत्यंत थकवणारी होती. रॉबर्ट फुल्टन यांनी वाफेचे इंजिन आणि ‘पॅडल व्हील’ यांच्या अचूक संयोजनातून या समस्येवर उपाय शोधला. प्रवास वेगवान, स्वस्त आणि नियमित करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते.

17 ऑगस्ट 1807 रोजी फुल्टन यांच्या ‘क्लेमॉन्ट’ नावाच्या बोटीने हडसन नदीवर आपला पहिला प्रवास सुरू केला. न्यूयॉर्क ते अल्बनी हे 240 किलोमीटरचे अंतर ‘क्लेमॉन्ट’ने अवघ्या 32 तासांत पूर्ण केले. विशेष म्हणजे, त्या काळातील पारंपरिक नौकांना हेच अंतर कापण्यासाठी सुमारे 4 दिवस लागत असत. परतीच्या प्रवासात या बोटीने आणखी वेग घेत केवळ 30 तासांत अंतर पार केले. सुरुवातीला लोक स्टीमबोटबाबत साशंक आणि भीतीपोटी होते. बोटीतून निघणारा काळा धूर, इंजिनचा आवाज आणि उडणार्‍या ठिणग्या पाहून लोकांनी रॉबर्ट फुल्टन यांना ‘मूर्ख’देखील म्हटले होते.

मात्र, जेव्हा या बोटीतून 60 प्रवाशांनी यशस्वी प्रवास केला, तेव्हा लोकांचा द़ृष्टिकोन बदलला. पहिल्यांदाच जगाला पाण्यावर एका विश्वासार्ह आणि नियमित प्रवासी सेवेचा अनुभव आला. स्टीमबोटच्या यशानंतर न्यूयॉर्क आणि अल्बनी या शहरांदरम्यान दररोज सेवा सुरू झाली. या बोटीत 24 हॉर्सपावरचे इंजिन आणि दोन मोठी पॅडल व्हील्स होती, ज्यामुळे मालाची ने-आण करणे सोपे झाले. या एका शोधाने केवळ नद्यांवरील व्यापारच वाढवला नाही, तर अमेरिकेच्या पश्चिम भागातील आर्थिक विकासाचे मार्गही खुले केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news