History of Cats and Humans | माणूस आणि मांजराचे नाते किती जुने?

History of Cats and Humans |
History of Cats and Humans | माणूस आणि मांजराचे नाते किती जुने?
Published on
Updated on

लंडन : घराघरांमध्ये आणि सोशल मीडियावर आपल्या क्युट हालचालींनी सर्वांना भुरळ घालणारी ‘मांजर’ हा मानवाचा सर्वात लाडका पाळीव प्राणी मानला जातो. पण, माणसाने मांजरीला नक्की कधीपासून पाळायला सुरुवात केली? हा प्रश्न अनेकांना पडतो. पूर्वी असा समज होता की, इजिप्तच्या लोकांनी सर्वात आधी मांजरी पाळायला सुरुवात केली. मात्र, अलीकडच्या पुरातत्त्वीय संशोधनाने हा समज खोटा ठरवला असून, माणूस आणि मांजरीच्या मैत्रीचा इतिहास सुमारे 10,000 वर्षे जुना असल्याचे समोर आले आहे.

काही वर्षांपूर्वी भूमध्य समुद्रातील ‘सायप्रस’ या बेटावर पुरातत्त्वशास्त्रज्ञांना उत्खननादरम्यान एका मानवाची कबर सापडली होती. या कबरीचे वैशिष्ट्य म्हणजे, तिथे माणसाच्या सांगाड्यासोबत एका मांजरीचा सांगाडाही अतिशय सुरक्षितपणे पुरलेला आढळला. कार्बन डेटिंगनुसार हे अवशेष सुमारे 9,500 वर्षे जुने आहेत. मांजरीला मानवी वस्ती असलेल्या बेटावर जहाजातून आणले गेले असावे आणि त्या काळीही माणसाचे मांजरीवर जीवापाड प्रेम असावे, हेच या कबरीवरून सिद्ध होते.

वैज्ञानिक संशोधनानुसार, माणसाने शिकार सोडून जेव्हा एका ठिकाणी स्थायिक होऊन शेती करायला सुरुवात केली, तेव्हाच मांजरी माणसाच्या जवळ आल्या. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी मध्य पूर्व आशियातील सुपीक प्रदेशात माणसाने धान्य साठवायला सुरुवात केली. या धान्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर उंदरांचा सुळसुळाट झाला. उंदरांच्या शिकारीसाठी जंगली मांजरी मानवी वस्तीभोवती घिरट्या घालू लागल्या. उंदरांपासून पिकांचे रक्षण होत असल्याने माणसानेही मांजरींना आपल्याजवळ राहू दिले. म्हणजेच, हा दोघांचा एकमेकांच्या फायद्यासाठी झालेला करार होता, जो पुढे मैत्रीत बदलला. जरी मांजरी पाळण्याची सुरुवात आधी झाली असली, तरी त्यांना घराघरांत मानाचे स्थान देण्याचे आणि त्यांना पाळण्याचे मोठे श्रेय प्राचीन इजिप्तच्या संस्कृतीला जाते.

सुमारे 4,000 वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये मांजरींना देवाचा दर्जा दिला गेला होता. तिथली ‘बास्टेट’ ही देवी मांजरीच्या रूपात पूजली जात असे. इजिप्तमध्ये मांजरीची हत्या करणार्‍याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाई. घरात पाळलेली मांजर मरण पावल्यास, घरातील लोक शोक म्हणून स्वतःच्या भुवया कोरत असत आणि मांजरीच्या शरीराला ‘ममी’ बनवून दफन केले जात असे. आज आपल्या घरात दिसणार्‍या सर्व पाळीव मांजरी या मुख्यत्वे आफ्रिकन जंगली मांजर (Felis lybica)) या प्रजातीच्या वंशज आहेत. जनुकीय अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, याच जंगली मांजरींनी हजारो वर्षांपूर्वी माणसाळायला सुरुवात केली आणि हळूहळू त्या जगभर पसरल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news