ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकात किती असते सोने?

ऑलिम्पिक सुवर्णपदकाची किंमत किती आहे?
How Much Gold Is in an Olympic Gold Medal?
Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : 2024 पॅरिस ऑलिम्पिकचा क्रीडा महाकुंभमेळा आता लवकरच भरत आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त सुवर्णपदके पटकावण्याचा सर्वच सहभागी देशांचा प्रयत्न असेल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून तीन प्रकारांची पदके विजेत्या खेळाडूंना दिली जात असतात, हे आपल्याला माहिती आहेच. त्यामध्ये सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कांस्यपदकाचा समावेश आहे. ही पदके जाडजूड आणि सुंदर दिसत असतात. मात्र, त्यांच्या नावाच्या धातूचा विचार करता, अशा पदकांमध्ये खरोखरच किती प्रमाणात तो धातू असतो व हे पदक त्याद़ृष्टीने किती मौल्यवान असते, याचेही अनेकांना कुतूहल असते.

‘सुवर्णपदक’ चांदीचे बनलेले असते

ऑलिम्पिक गोल्ड मेडल म्हणजेच सुवर्णपदक हे झळाळत्या सोनेरी रंगाचे दिसते आणि ते कदाचित पूर्णपणे सोन्यानेच बनलेले असावे असे कुणालाही वाटू शकते. मात्र, वास्तवात तसे नसते! हे ‘सुवर्णपदक’ खरे तर रूपे म्हणजेच चांदीचे बनलेले असते व त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला असतो. या पदकामध्ये 92.5 टक्के चांदी असते. त्यावर सहा ग्रॅम शुद्ध सोन्याचा मुलामा दिलेला असतो. याबाबतचा खुलासा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या एका प्रवक्त्यानेच 2021 मध्ये केला होता. पहिल्या आणि दुसर्‍या स्थानांसाठीची पदके ही किमान 925-1000 ग्रेडच्या चांदीने बनलेली असावीत तसेच पहिल्या स्थानासाठीच्या पदकावर किमान 6 ग्रॅम सोन्याचा मुलामा असावा, असे ठरलेले असल्याचे त्यांनी सांगितले होते. याचा अर्थ सुवर्णपदक आणि रौप्यपदक ही दोन्ही पदके मुळात ‘रौप्यपदके’च असतात.

यंदाच्या सुवर्णपदकाची किंमत 750 ते 850 डॉलर्स

सुवर्णपदकावर सोन्याचा मुलामा दिलेला असतो, इतकाच फरक! ब्राँझ मेडल म्हणजेच कांस्य पदक हे 95 टक्के कांस्य आणि 5 टक्के झिंक म्हणजेच जस्ताचे असते. या पदकांच्या बाजारातील मूल्याचा विचार करता, त्यांच्यामधील धातुंमुळे ते फारसे मौल्यवान नसतात. यंदा ‘एलव्हीएमएच’ ग्रुपच्या ‘चौमेट’ या कंपनीने ऑलिम्पिक पदकांचे डिझाईन केले आहे. त्यामध्ये पॅरिसच्या आयफेल टॉवरच्या मूळ धातूच्या तुकड्यांचाही वापर केल्याने ही पदके थोडी अधिक मौल्यवान बनलेली आहेत. यंदाच्या सुवर्णपदकाची किंमत 750 ते 850 डॉलर्स म्हणजेच सुमारे 62,700 रुपये ते 71 हजार रुपयांपर्यंत असू शकते. रौप्यपदकाची किंमत 450 डॉलर्स म्हणजे सुमारे 37,600 रुपये असू शकते व कांस्यपदकाची किंमत 5 डॉलर्स म्हणजेच 418 रुपये असू शकते. अर्थातच ही झाली धातूंमुळे मोजलेली बाजारभावातील किंमत. खेळाडूंनी आपल्या मेहनतीने स्पर्धा गाजवून पटकावलेल्या कोणत्याही पदकाची किंमत ही अमूल्यच असते!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news