

नवी दिल्ली : हल्ली कोण कसला भन्नाट प्रकार करील याचा अंदाज करणे कठीण झालेले आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का? एक किलो मिठामध्ये जास्तीत जास्त किती दाणे असू शकतात? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चार मित्रांनी मिळून हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे की, एक किलो मिठामध्ये किती दाणे असू शकतात?
त्यासाठी या चार मित्रांनी मिठाचं एक किलोचं पॉकेट विकत घेतलं. त्यानंतर त्यांनी या पॉकेटमधलं मीठ काळजीपूर्वक एक टेबलवर पसरवलं आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की एका किलो मिठामध्ये नेमके किती दाणे असतात. त्यानंतर या चारही मित्रांनी एक-एक दाणे मोजण्यास सुरुवात केली. त्यांना एक किलो मिठाचे दाणे मोजण्यासाठी तब्बल 9 दिवस लागले. 9 व्या दिवशी अखेर आकडा समोर आला. या चार मित्रांनी केलेल्या दाव्यानुसार 100 ग्रॅम मिठामध्ये जवळपास 13 लाख 75 हजार दाणे आहेत.
याच हिशेबाने एक किलो मिठामध्ये 1 कोटी 37 लाख 50 हजार दाणे असायला पाहिजेत, मात्र या मित्रांनी केलेल्या दाव्यानुसार एक किलो मिठामध्ये 1 कोटी 42 लाख 13 हजार 753 दाणे आहेत; परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हा एक अंदाज आहे. वैज्ञानिकांच्या मते मिठाच्या प्रत्येक दाण्याचा आकार हा वेगवेगळा असतो, त्यामुळे एक किलो मिठातील दाण्यांची संख्या देखील कमी-जास्त होऊ शकते. जर सरासरी काढायची झाली तर एक किलो मिठामध्ये जास्तीत जास्त 1 ते 2 कोटी दाणे असू शकतात.
यापूर्वी देखील काही जणांनी एक किलो मिठामध्ये किती दाणे असू शकतात, हे मोजण्याचा प्रयत्न केला आहे. ही संख्या 8 कोटींपर्यंत पोहोचली आहे. एक किलो मिठामध्ये किती दाणे असू शकतात हे त्या मिठाचे दाणे किती मोठे किंवा बारीक आहेत, यावर अवलंबून असू शकतात. आणखी एका अंदाजानुसार जर मिठाचा एक दाणा 0.1 मिलिमीटर मानला तर एक किलो मिठाच्या दाण्यांची संख्या तब्बल 83 कोटी एवढी देखील असू शकते. काही मिठाचे दाणे हे बारीक असतात तर काही मिठाचे दाणे हे मोठे असतात, त्यामुळे त्यांच्या आकारानुसार ही संख्या कमी-जास्त होऊ शकते.