

नवी दिल्ली : आपण दररोज खात असलेल्या पदार्थांमधून आपल्या शरीराला किती ऊर्जा (कॅलरीज) मिळते, त्याचा आपल्या वजनावर व आरोग्यावर काय परिणाम होतो, याबद्दल सध्या लोक जागरूक होऊन समजून घेत आहेत. आज आपण आपल्या आवडत्या स्ट्रीट फूड आणि नाश्त्याच्या पदार्थांमध्ये किती कॅलरीज असतात, याचे गणित जाणून घेऊया.
1. समोसा : भारतात समोसा प्रचंड लोकप्रिय आहे. गल्लीबोळातील प्रत्येक दुकानात मिळणारा हा मसालेदार, बटाटा भरलेला समोसा खरोखरच चविष्ट असतो. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास, एका साधारण बटाट्याच्या समोसामध्ये 250 ते 300 कॅलरीज असतात. समोसामध्ये भरल्या जाणार्या सारणानुसार हे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.
2. वडापाव : मुंबईकरांचा जीव की प्राण असलेला वडा पाव आता देशभरातील इतर शहरांमध्येही तितकाच लोकप्रिय झाला आहे. पावाच्या मध्यभागी बटाट्याचा तळलेला वडा, सोबत चटणी आणि तळलेली मिरची अशा पद्धतीने चवीने हा वडापाव खाल्ला जातो. चवीला उत्तम असणार्या एका वडापावमधून शरीराला तब्बल 300 ते 350 कॅलरीज मिळतात.
3. पकोडे किंवा भजी : भारतात भजी खूप आवडीने खाल्ले जातात. विशेषतः पावसाळ्यात चहा आणि भजीची जुगलबंदी अप्रतिम ठरते. बटाटे, पालक, पनीर आणि कांदे अशा विविध घटकांपासून भजी बनवल्या जातात. त्यामुळे त्यातील घटकांनुसार कॅलरीज बदलतात. तरीही, 4 ते 5 कांदा भजी खाल्ल्यास शरीरात अंदाजे 200 ते 300 कॅलरीज जातात.
4. कचोरी : कुरकुरीत आणि डाळीचे चटपटीत सारण भरलेली कचोरी अनेकदा बटाट्याच्या रस्सा भाजीसोबत खाल्ली जाते. चवीला छान असली तरी ती तेलात तळलेली असल्याने तिचे जास्त सेवन केल्यास पोटाचे विकार होऊ शकतात. एका कचोरीमध्ये साधारणपणे 180 ते 250 कॅलरीज असतात. जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि तरीही बाहेरच्या चवीचा आनंद घ्यायचा असेल, तर पुढील पर्याय उत्तम मानले जातात :
ढोकळा: गोड, आंबट आणि तिखट चवीचा ढोकळा हा खायला अतिशय हलका असतो. वाफेवर शिजवला जात असल्यामुळे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. तुम्ही सहज दोन ते तीन ढोकळे खाल्ले, तरी त्यातून केवळ 150 ते 180 कॅलरीज मिळतात.
इडली : सर्वात कमी कॅलरी असलेला आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम नाश्ता म्हणजे इडली-सांबार. एका इडलीमध्ये अवघ्या 40 ते 50 कॅलरीज असतात, ज्यामुळे फिटनेस प्रेमींसाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.