

कॅनबेरा : अंटार्क्टिकाच्या आसपासच्या समुद्राच्या तळाशी प्राचीन 'महापर्वतांचे' (Supermountains) अवशेष शास्त्रज्ञांना सापडले आहेत. या प्राचीन शिखरांमधून मिळालेल्या पोषक तत्त्वांमुळेच लाखो वर्षांनंतर पृथ्वीवर गुंतागुंतीच्या (जटिल) जीवसृष्टीचा झपाट्याने विकास झाला असावा, असा दावा संशोधकांनी केला आहे. मात्र, इतर काही शास्त्रज्ञांनी या निष्कर्षांबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
सुमारे ६० कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील भूभाग एकमेकांवर आदळून 'गोंडवाना' हा महाखंड तयार झाला होता. यामध्ये आजचा दक्षिण अमेरिका, आफ्रिका, अरेबिया, मादागास्कर, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका यांचा समावेश होता. त्या काळात बहुपेशीय जीवसृष्टी अस्तित्वात होती, परंतु ती अत्यंत प्राथमिक अवस्थेत होती. भूखंडांच्या या धडकेमुळे आजच्या अंटार्क्टिकाच्या भागात हिमालयासारखे प्रचंड मोठे पर्वत तयार झाले होते, असे यापूर्वीच्या संशोधनातून सुचवण्यात आले होते. आता 'अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स लेटर्स' या नियतकालिकात १२ सप्टेंबर रोजी ऑनलाईन प्रसिद्ध झालेल्या नवीन अभ्यासात शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, गोंडवानातील या पर्वतांची हजारो वर्षे धूप होऊन समुद्रात साचलेला गाळ त्यांना सापडला आहे.
या संशोधनात सहभागी नसलेले ऑस्ट्रेलियातील मॅक्वेरी विद्यापीठाचे शैलतज्ज्ञ (Petrologist) नाथन डॅक्झको यांनी सांगितले की, "गोंडवाना महाखंडाच्या निर्मितीदरम्यान अनेक मोठ्या भूखंडांच्या धडका झाल्या होत्या, ज्यातून आजच्या हिमालय आणि तिबेटच्या पठाराइतक्या विशाल पर्वतरांगांचे जाळे तयार झाले होते, असे हे निष्कर्ष दर्शवतात. "अंटार्क्टिकाखाली किती मोठा भूशास्त्रीय इतिहास दडलेला आहे, हे या अभ्यासातून स्पष्ट होते, असेही डॅक्झको म्हणाले. अंटार्क्टिकाचा बहुतांश भाग बर्फाच्या जाड थराखाली दबलेला असल्याने, तेथील उत्क्रांतीचा इतिहास समजून घेणे कठीण असते. ही अडचण दूर करण्यासाठी संशोधकांच्या पथकाने अंटार्क्टिकाच्या सभोवतालच्या १२ ठिकाणी समुद्राच्या तळाशी ड्रिलिंग करून मातीचे नमुने गोळा केले. या नमुन्यांमध्ये ते 'डेट्रायटल झिर्कोन' नावाचे प्राचीन स्फटिक शोधत होते. झिर्कोन हे खडकांमध्ये तयार होणारे असे खनिज आहे, जे खडकाची धूप झाली तरी रासायनिकदृष्ट्या अबाधित राहण्याइतके मजबूत असते.