Dinosaur Running Speed | डायनासोर खरंच किती वेगाने धावत होते?

how-fast-did-dinosaurs-really-run
Dinosaur Running Speed | डायनासोर खरंच किती वेगाने धावत होते?Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : डायनासोरच्या वेगाबद्दल आपण आजवर जे ऐकत आलो आहोत, ते कदाचित पूर्णपणे सत्य नसेल. इंग्लंडमधील ऑक्सफर्डजवळील उत्खनन स्थळी एका मोठ्या ‘सॉरोपॉड’ डायनासोरच्या जीवाश्म बनलेल्या पावलाचे ठसे सापडले आहेत. लाखो वर्षांपूर्वी ओल्या जमिनीवर चालताना डायनासोरने मागे सोडलेले हे ठसे त्यांच्या धावण्याचा वेग मोजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. तुम्ही जितक्या वेगाने धावता, तितकी तुमची पावले लांब पडतात, असे यासंदर्भात संशोधन करणारे पॅलेओबायोलॉजिस्ट (प्राचीन जीवशास्त्रज्ञ) पीटर फॉकिंगहॅम यांनी सांगितले.

1970 च्या दशकात, प्राणीशास्त्रज्ञ रॉबर्ट मॅकनील अलेक्झांडर यांनी याच तत्त्वाचा वापर करून प्राण्यांच्या पावलांच्या ठशांमधील अंतरावरून त्यांचा वेग मोजण्यासाठी एक गणिती समीकरण (फॉर्म्युला) विकसित केले. या समीकरणामुळे शास्त्रज्ञांना डायनासोरच्या वेगाची गणना करणे सोपे झाले. उदाहरणार्थ, ‘टायरानोसॉरस रेक्स’ (टी-रेक्स) ताशी 20 किलोमीटर वेगाने, तर ‘वेलोसिराप्टर’ ताशी 40 किलोमीटर वेगाने धावू शकत होता, असे निष्कर्ष काढण्यात आले. या समीकरणात आकडे टाकून उत्तर मिळवणे सोपे वाटत असले तरी फॉकिंगहॅम आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या मते, या समीकरणात अनेक त्रुटी आहेत. हे समीकरण मूळतः कठीण जमिनीवर चालणार्‍या सस्तन प्राण्यांसाठी विकसित केले गेले होते. मात्र, डायनासोरचे ठसे केवळ ओल्या आणि मऊ चिखलातच तयार होतात. डायनासोरची हाडांची रचना सस्तन प्राण्यांपेक्षा आधुनिक पक्ष्यांसारखी होती. वेग मोजण्यासाठी प्राण्याच्या कमरेची जमिनीपासूनची उंची महत्त्वाची असते. परंतु, केवळ पावलांचे ठसे सापडल्यावर ही उंची नेमकेपणाने सांगणे अशक्य असते. या सर्व कारणांमुळे फॉकिंगहॅम यांनी हे गणित प्रत्यक्षात तपासण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी डायनासोरचे आधुनिक वंशज मानल्या जाणार्‍या पक्ष्यांची मदत घेतली.

चिखलातील पक्ष्यांचा प्रयोग

सुमारे दहा वर्षांपूर्वी, हेल्मेटेड गिनी फाऊल या पक्ष्यांवर केलेल्या एका प्रयोगाच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगचा वापर या नवीन अभ्यासासाठी करण्यात आला. त्या प्रयोगात पक्ष्यांना चिखलातून चालवून त्यांच्या पायांच्या हालचालींचा अभ्यास केला गेला होता. शास्त्रज्ञांनी खसखस आणि काचेचे सूक्ष्म फुगे वापरून स्वतः चिखल तयार केला होता, जेणेकरून एक्स-रेद्वारे पक्ष्यांचे पाय चिखलात कसे हालचाल करतात हे पाहता येईल. फॉकिंगहॅम सांगतात, हा खूप किचकट प्रयोग होता. पक्षी त्यात सतत घाण करत होते, ज्यामुळे दुसर्‍या दिवशी चिखलाला वास यायचा. प्रयोगाच्या शेवटच्या दिवशी, शास्त्रज्ञांनी दोन पक्ष्यांना चिखलावर मोकळेपणाने फिरू दिले आणि त्यांच्या हालचालींचे हाय-स्पीड व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. दहा वर्षांनंतर, याच व्हिडीओंच्या आधारे केलेल्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले. त्यानुसार पक्ष्यांनी चिखलात सोडलेल्या पावलांच्या ठशांवरून समीकरणाने काढलेला वेग, त्यांच्या वास्तविक वेगाशी जुळत नव्हता. समीकरणाने दाखवलेला वेग हा पक्ष्यांच्या वास्तविक वेगापेक्षा दीड पटीने जास्त होता. याचे मुख्य कारण म्हणजे मऊ आणि चिकट चिखलात चालताना पक्ष्यांचा वेग कमी होत होता. तसेच, मोकळेपणी फिरताना प्राणी एकाच लयीत पावले टाकत नाहीत; ते कधी वेग वाढवतात, तर कधी कमी करतात. फॉकिंगहॅम स्पष्टपणे सांगतात की, हा अभ्यास डायनासोरच्या वेगाबद्दलचा अंतिम शब्द नाही, परंतु तो हे नक्कीच दाखवतो की, प्रयोगशाळेत तयार केलेले गणित वास्तविक जगात तंतोतंत लागू होत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news