

ॲनेस्थेशिया हे वैद्यकीय विज्ञानाचे एक मोठे वरदान मानले जाते. जगभरात दरवर्षी कोट्यवधी शस्त्रक्रिया केवळ यामुळेच सुरक्षितपणे पार पडतात. कारण, ॲनेस्थेशियाच्या (भूल देणे) मदतीने रुग्णाला नियंत्रित पद्धतीने वेदनामुक्त आणि बेशुद्धावस्थेत ठेवता येते. जर ॲनेस्थेशियाचा शोध लागला नसता, तर हृदय-मेंदूच्या शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण, सिझेरियन किंवा अगदी साधे ऑपरेशन करणेही अत्यंत वेदनादायक आणि अशक्य झाले असते. ॲनेस्थेशियाच्या इंजेक्शनमध्ये नक्की असे काय असते, जे काही सेकंदांतच पूर्ण शरीर किंवा शरीराचा एखादा भाग सुन्न करून टाकते? हृदय धडधडत राहते, श्वास सुरू राहतो; पण ऑपरेशनच्या वेदना मात्र जाणवत नाहीत. यामागील विज्ञान जाणून घेऊया...
ॲनेस्थेशिया ही अशी वैद्यकीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये विशेष औषधांच्या मदतीने रुग्णाला वेदना जाणवू दिल्या जात नाहीत. यात केवळ रुग्णाला बेशुद्ध केले जात नाही, तर रुग्णाची चेतना, वेदनेची जाणीव, स्नायूंची हालचाल आणि काही वेळा तात्पुरत्या स्वरूपात स्मरणशक्ती देखील नियंत्रित केली जाते. हे औषध नसांमधून मेंदूपर्यंत जाणारे ‘सेन्सरी सिग्नल्स’ (संवेदनांचे संकेत) रोखून काम करते.
१. जनरल ॲनेस्थेशिया : यामध्ये रुग्ण पूर्णपणे बेशुद्धावस्थेत असतो.
२. रीजनल ॲनेस्थेशिया : यामध्ये शरीराचा एखादा मोठा भाग बधिर केला जातो.
३. लोकल ॲनेस्थेशिया : यामध्ये शरीराचा केवळ एक छोटासा भाग (उदा. दात किंवा बोट) बधिर केला जातो.
४. सेडेशन : यामध्ये रुग्ण पूर्ण बेशुद्ध नसतो, तर तो अत्यंत शांत आणि डुलकीच्या अवस्थेत असतो.
आपल्याला वेदना किंवा जखम कशी जाणवते, हे समजून घेतल्यास ॲनेस्थेशियाचे काम समजणे सोपे जाईल. जेव्हा शरीराला दुखापत होते, तेव्हा नसा त्या जखमेची माहिती विद्युत संकेतांच्या स्वरूपात मेंदूपर्यंत पोहोचवतात. मेंदू या संकेतांना 'वेदना' म्हणून समजतो. लोकल आणि रीजनल ॲनेस्थेशियामध्ये औषधे नसांमधील 'सोडियम चॅनेल्स' तात्पुरत्या स्वरूपात ब्लॉक करतात. यामुळे विद्युत संकेत पुढे जाऊ शकत नाहीत आणि मेंदूपर्यंत वेदनेची माहिती पोहोचतच नाही. जनरल ॲनेस्थेशियामध्ये हे औषध थेट मेंदू आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करते. हे मेंदूच्या पेशींमधील 'न्यूरोट्रांसमीटर' विशेषतः गाबा (GABA) ची सक्रियता वाढवते आणि उत्तेजना निर्माण करणारे संकेत कमी करते. यामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांचा एकमेकांशी असलेला संपर्क तात्पुरता तुटतो. ही एका प्रकारची 'रिव्हर्सिबल कोमा' (तात्पुरती कोमा) सारखी स्थिती असते. एक ठरावीक वेळ निघून गेल्यावर जेव्हा औषधाचा परिणाम हळूहळू कमी होतो, तेव्हा रुग्ण पुन्हा शुद्धीवर येतो.
ॲनेस्थेशिया अत्यंत सुरक्षित मानला जातो, तरीही काही प्रकरणांमध्ये याचे दुष्परिणाम दिसू शकतात. शस्त्रक्रियेनंतर घसा खवखवणे, मळमळ आणि उलट्या, गोंधळलेली अवस्था, स्नायू दुखणे, थंडी वाजून येणे किंवा डोकेदुखी अशा सामान्य समस्या उद्भवू शकतात.
ॲनेस्थेशियामधील सर्वात दुर्मीळ आणि भीतिदायक गुंतागुंत म्हणजे 'ॲनेस्थेशिया अवेअरनेस', म्हणजेच सर्जरी सुरू असतानाच रुग्णाला अचानक जाग येणे. अत्यंत दुर्मीळ स्थितीमध्ये असे घडू शकते. हा धोका टाळण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये अशा अत्याधुनिक मशिन्स असतात, ज्या रुग्णाच्या 'ब्रेन वेव्हज'वर (मेंदूच्या तरंगांवर) बारीक लक्ष ठेवतात. रुग्ण जागा होत असल्याचे दिसताच या मशिन्स डॉक्टरांच्या टीमला अलर्ट करतात आणि डॉक्टर त्यानुसार औषधाचा डोस ॲडजस्ट करतात.