

लंडन : समुद्राच्या आत एक मोठा खजिना दडलेला आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता का? हा खजिना शुद्ध सोन्याच्या रूपात समुद्रात लपलेला आहे, ज्याची किंमत अब्जावधी डॉलर्स असू शकते. वैज्ञानिकांचा अंदाज आहे की, पृथ्वीच्या महासागरांमध्ये आणि समुद्रांमध्ये लाखो टन सोने दडलेले आहे, जे पाण्यात मिसळलेले आहे. वैज्ञानिकांनी हे सोने काढण्याच्या पद्धतींवर संशोधन केले आहे; पण हे काम सोपे नाही.
प्रत्येक 10 कोटी मेट्रिक टन समुद्राच्या पाण्यात केवळ एक ग्रॅम सोने आढळते. त्यामुळे, प्रश्न हा आहे की, हे सोने कसे काढता येईल आणि भविष्यात समुद्रातून सोने काढणे शक्य होईल का? 2018 मध्ये ‘नेचर’ आणि ‘जर्नल ऑफ द अमेरिकन केमिकल सोसायटी’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासांनी हे सोने काढण्याचे काही मार्ग सुचवले आहेत; पण ही प्रक्रिया अजूनही आर्थिकद़ृष्ट्या खूप गुंतागुंतीची आहे. वैज्ञानिकांचे असे मत आहे की, समुद्रात सुमारे 2 कोटी टन सोने मिसळलेले आहे, ज्याची सध्याच्या अंदाजानुसार, किंमत सुमारे 20,000 कोटी डॉलर्स असू शकते. या सोन्याच्या खाणकामावर नेहमीच चर्चा होते; पण त्यावर कोणताही उपाय अजून निघालेला नाही.
समुद्रातून सोने काढणे ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. मोठ्या क्षेत्रात सोने खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. एक लिटर पाण्यात 1 नॅनोग्रॅमपेक्षाही कमी सोने असते. इथे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, 1 अब्ज नॅनोग्रॅम म्हणजे एक ग्रॅम होतो. त्यामुळे, समुद्रातून खाणकाम करणे हे एक मोठे तांत्रिक आव्हान आहे. 1941 मध्ये ‘नेचर’ मासिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, इलेक्ट्रोकेमिकल पद्धतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, ज्याचा खर्च सोन्याच्या मूल्यापेक्षा 5 पट जास्त होता.
हे सोने नैसर्गिक प्रक्रियांमुळे समुद्रात पोहोचले आहे. त्यापैकी एक प्रक्रिया म्हणजे भू-अपरदन (land erosion). याचा अर्थ, खडक आणि इतर नैसर्गिक वस्तूंमधून सोने हळूहळू समुद्रात मिसळते. पाऊस आणि नद्या हळूहळू खडकांना तोडतात. या प्रक्रियेत, त्यातील काही सोन्याचा भाग समुद्रात पोहोचतो. याशिवाय, ‘हायड्रोथर्मल व्हेंट’ (hydrothermal vent) देखील यासाठी जबाबदार आहेत. हे अशा ठिकाणी होते जिथे टेक्टोनिक प्लेटस् एकत्र येतात. यामुळे उष्णतेमुळे सोन्यासह विरघळलेल्या खनिजांनी युक्त द्रवपदार्थ बाहेर पडतात.