How Birds Began Flying | सुरुवातीच्या पक्ष्यांनी उडणे कसे सुरू केले?

How Birds Began Flying |
How Birds Began Flying | सुरुवातीच्या पक्ष्यांनी उडणे कसे सुरू केले?
Published on
Updated on

पॅरिस : गेल्या जवळपास एका शतकापासून वैज्ञानिक एका प्रश्नाचे उत्तर शोधत होते...‘पृथ्वीवर पक्ष्यांनी सर्वात आधी उडणे कसे सुरू केले?’ ते धावता धावता हवेत उडले होते की झाडांवरून खाली सरकत त्यांनी उड्डाण केले होते? ऑगस्ट २०२६ मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन वैज्ञानिक अभ्यासाने या वादाला एक नवी दिशा दिली आहे.

‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊथम्प्टन’ आणि पॅरिसच्या ‘नॅशनल नॅचरल हिस्ट्री म्युझियम’च्या संशोधनानुसार, सर्वात जुना ज्ञात पक्षी ‘आर्किओप्टेरिक्स’ (Archaeopteryx) आधुनिक पक्ष्यांप्रमाणे थेट उड्डाण करू शकत नव्हता. त्याच्या उड्डाणाची सुरुवात दोन पायांवर मारलेल्या अनेक जलद उड्यांनी होत असे. आर्किओप्टेरिक्स सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर राहत होता. त्याला डायनासोर आणि आधुनिक पक्ष्यांमधील अत्यंत महत्त्वाची साखळी मानले जाते. त्याच्या शरीरावर पिसे आणि पंखांसारखी रचना होती; परंतु त्याचे दात, नखे आणि लांब हाडांची शेपटी त्याला डायनासोरसारखे बनवत होती.

वैज्ञानिकांच्या मते, आधुनिक पक्ष्यांप्रमाणे जलद आणि शक्तिशाली उड्डाण करण्यासाठी त्याचे शरीर पूर्णपणे विकसित झाले नव्हते. त्यामुळे त्याच्या उड्डाणाची पद्धत आजच्या पक्ष्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. अभ्यासानुसार आर्किओप्टेरिक्सच्या शरीरात तीन मोठ्या मर्यादा होत्या : १. त्याच्या छातीत आधुनिक पक्ष्यांप्रमाणे मोठे हाड नव्हते, ज्याला उड्डाणासाठी लागणारे मजबूत स्नायू जोडलेले असतात. २. त्याच्या खांद्यांचे सांधे पूर्णपणे विकसित नव्हते, ज्यामुळे तो पंख पूर्णपणे वर उचलू शकत नव्हता. ३. एकाच उडीतून थेट हवेत उडण्याइतकी ताकद निर्माण होत नसे. त्यामुळे आजच्या पक्ष्यांप्रमाणे पंख पसरवून लगेच उडून जाणे त्याला शक्य नव्हते.

लाखो वर्षांत आर्किओप्टेरिक्सचे जीवाश्म दबून चपटे झाले आहेत, त्यामुळे त्याच्या प्रत्यक्ष हालचाली समजणे सोपे नव्हते. ही समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिकांनी अत्याधुनिक ३D संगणक मॉडेल तयार केले. यामध्ये स्नायूंची कमाल ताकद, सांध्यांची हालचाल, हाडांवर येणारा ताण आणि हवेचा प्रभाव या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला. यानंतर सुमारे ४०० ग्रॅम वजन असलेल्या आर्किओप्टेरिक्सच्या अब्जावधी संभाव्य हालचालींची चाचणी संगणकाद्वारे घेण्यात आली.

सिम्युलेशनच्या निकालांनी वैज्ञानिकांना चक्रावून टाकले : दरवेळी जेव्हा आर्किओप्टेरिक्सला एकाच उडीच्या साहाय्याने उडवण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा तो अपयशी ठरला. परंतु, जेव्हा मॉडेलमध्ये लगातार दोन पायांनी अनेक जलद उड्या मारण्यात आल्या आणि त्यानंतर पंख फडफडवण्याची प्रक्रिया जोडली गेली, तेव्हा तो यशस्वीपणे हवेत उडू शकला! संशोधनानुसार, उड्डाणासाठी लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी सुमारे ९० टक्के बल त्याच्या पायांमधून येत असे, तर पंख नंतर उड्डाण टिकवून ठेवण्यास मदत करत असत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news