Undersea Cable Repair | समुद्रातील तुटलेली इंटरनेट केबल कशी दुरुस्त करतात?

how-broken-undersea-internet-cable-is-repaired
Published on
Updated on

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात लाल समुद्राखालून जाणार्‍या ऑप्टिक केबल्स तुटल्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये इंटरनेटची गती मंदावली होती. केबल तुटल्यामुळे मध्य-पूर्व आणि दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये इंटरनेटची समस्या निर्माण झाली होती. सहसा, समुद्राखालील केबल्स तुटण्यामागे जहाजांचे अँकर, नैसर्गिक आपत्ती, तोडफोड किंवा युद्ध अशी कारणे जबाबदार असतात. समुद्राखाली केबल टाकण्यापेक्षा त्यातील बिघाड दुरुस्त करणे हे अधिक कठीण काम असते. जर कुठे केबल तुटली असेल, तर ती शोधून दुरुस्त करायला कित्येक महिने लागू शकतात. अनेक लोक असा विचार करतात की, केबल तुटल्यास पाण्यात जाऊन ती दुरुस्त केली जाते. हे खरे असले, तरी ही माहिती अपूर्ण आहे. चला तर मग, समुद्राखाली तुटलेली केबल कशी दुरुस्त करतात ते जाणून घेऊया.

इंटरनेट कंपन्या सतत डेटाचा प्रवाह (data flow) तपासत असतात. कोणत्याही केबलमध्ये अडचण येताच, नेटवर्क लगेचच धीमे होते किंवा पूर्णपणे बंद होते. अशावेळी, तंत्रज्ञ ‘टेस्ट सिग्नल’ पाठवून केबल कुठे तुटली आहे, हे शोधून काढतात. समुद्रात विशेष प्रकारची जहाजे असतात, ज्यांना ‘केबल शिप’ म्हणतात. हे जहाज जीपीएस (GPS) आणि पाण्याखालील नकाशांच्या (underwater maps) मदतीने तुटलेल्या भागापर्यंत पोहोचतात. केबल कुठे तुटली आहे, हे कळल्यावर केबल शिपला तिथे पाठवले जाते.

त्यानंतर, केबल वर खेचण्यासाठी जहाजातून एक खास प्रकारचे ग्रॅपल (लोखंडी हुकसारखे उपकरण) समुद्राच्या खोलीत पाठवले जाते. या ग्रॅपलने तुटलेली केबल पकडून हळूहळू जहाजावर वर खेचली जाते. जहाजावर, अभियंते दोन्ही टोक स्वच्छ करतात आणि फायबर ऑप्टिकच्या धाग्यांना विशेष तंत्रज्ञानाने जोडतात. ही जोडणी प्रक्रिया अत्यंत अचूक असते, कारण फायबर ऑप्टिकची तार केसापेक्षाही पातळ असते. दुरुस्तीनंतर, केबल पुन्हा काळजीपूर्वक समुद्राच्या खोलीत सोडली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया काही दिवसांपासून ते अनेक महिन्यांपर्यंत चालू शकते, हे तुटलेली जागा आणि खोलीवर अवलंबून असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news