

तंजावर : आजच्या काळात मोठमोठी यंत्रे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून गगनचुंबी इमारती उभारल्या जातात; पण कल्पना करा 1,000 वर्षांपूर्वी जेव्हा कोणतीही क्रेन किंवा आधुनिक साधने नव्हती, तेव्हा तब्बल 80 टनांचा कळस असलेले 216 फूट उंच मंदिर कसे उभारले गेले असेल? हे केवळ स्वप्न नाही, तर तामिळनाडूतील तंजावर शहरात आजही दिमाखात उभ्या असलेल्या बृहदेश्वर मंदिराचे वास्तव आहे. चोळ साज्याच्या स्थापत्यकलेचा हा उत्कृष्ट नमुना आजही आधुनिक अभियंत्यांना आणि इतिहासकारांना आश्चर्याच्या धक्क्यात बुडवून टाकतो. चोळ सम्राट राजाराज पहिला यांनी इ.स. 1003 ते 1010 या काळात बांधलेले हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. या मंदिराला ‘राजराजेश्वरम्’ किंवा ‘पेरुवुदैयार कोविल’ असेही म्हटले जाते. हे केवळ एक प्रार्थनास्थळ नसून, ते चोळ साम्राज्याची शक्ती, कला आणि संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे.
बृहदेश्वर मंदिराची रचना पूर्णपणे द्रविड शैलीत केली आहे. या मंदिराच्या बांधकामात वापरलेला प्रत्येक दगड हा ग्रॅनाईटचा आहे, जो जगातील सर्वात कठीण दगडांपैकी एक मानला जातो. आश्चर्य म्हणजे, मंदिराच्या आसपास 60 किलोमीटरच्या परिसरात कुठेही ग्रॅनाईटच्या खाणी नाहीत. मग लाखो टन वजनाचे हे दगड इथे कसे आणले गेले, हे एक मोठे रहस्य आहे. मंदिराचे मुख्य शिखर, ज्याला ‘विमान’ म्हटले जाते, त्याची उंची सुमारे 216 फूट (66 मीटर) आहे. हे जगातील सर्वात उंच मंदिरांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, हे संपूर्ण बांधकाम कोणत्याही प्रकारचे सिमेंट किंवा जोडणीच्या साहित्याशिवाय, केवळ दगडांना एकमेकांत अडकवून (इंटरलॉकिंग पद्धतीने) केले आहे.
या मंदिराचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे त्याच्या शिखरावर ठेवलेला एकसंध, 80 टन वजनाचा दगड, ज्याला ‘कुंभम’ म्हणतात. 1,000 वर्षांपूर्वी सुमारे 200 फुटांपेक्षा जास्त उंचीवर हा महाकाय दगड कसा नेला गेला असेल, हा प्रश्न आजही अनेकांना पडतो. यावर अनेक तर्कवितर्क लावले जातात. सर्वात प्रचलित सिद्धांतानुसार, मंदिराच्या शिखरापर्यंत दगड पोहोचवण्यासाठी अनेक किलोमीटर लांबीचा एक मातीचा उतार (रॅम्प) तयार करण्यात आला होता. हत्ती आणि हजारो मजुरांच्या मदतीने या उतारावरून तो दगड वर चढवण्यात आला असावा, असे मानले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एकाच दगडातून कोरलेली नंदीची भव्य मूर्ती आहे.
ही भारतातील दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी नंदीची मूर्ती मानली जाते. एक प्रसिद्ध समज असा आहे की, मंदिराच्या मुख्य शिखराची सावली दुपारच्या वेळी जमिनीवर पडत नाही. जरी यात वैज्ञानिकद़ृष्ट्या पूर्ण तथ्य नसले, तरी मंदिराची रचना इतक्या कुशलतेने केली आहे की, शिखराच्या सावलीचा प्रभाव कमीत कमी जाणवतो, जे त्याच्या स्थापत्य कलेचेच एक वैशिष्ट्य आहे. युनेस्कोने या मंदिराला ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित केले आहे. हे केवळ एक ऐतिहासिक स्मारक नसून, आजही येथे नियमित पूजाअर्चा केली जाते, ज्यामुळे हा एक ‘जिवंत वारसा’ बनला आहे. मंदिराच्या भिंतींवर चोळकालीन संस्कृती, समाज आणि इतिहासाची माहिती देणारी अनेक शिल्पे आणि शिलालेख कोरलेले आहेत.