

कीव्ह : सुमारे 18,000 वर्षांपूर्वीच्या भीषण हिमयुगात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मानवाने काय शक्कल लढवली असेल? एका नवीन संशोधनातून एक थक्क करणारा खुलासा झाला आहे. सध्याच्या युक्रेनमधील भागात राहणार्या तत्कालीन लोकांनी कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी चक्क महाकाय ‘मॅमथ’ (केसाळ हत्ती) प्राण्याच्या हाडांचा वापर करून आपली घरे (निवारे) बांधली होती.
पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ‘मॅमथ’चे अवशेष युक्रेनची राजधानी कीव्हपासून साधारण 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘मेझिरीच’ गावाजवळ आढळले आहेत. या घरांच्या बांधणीतून असे दिसून येते की, त्या काळातील मानवी समुदायाने अत्यंत प्रतिकूल वातावरणातही जगण्याची कला अवगत केली होती. त्यांनी या महाकाय प्राण्यांच्या अवशेषांचे रूपांतर चक्क संरक्षक वास्तूकलेमध्ये केले होते.
कीव्हमधील ‘तारास शेवचेन्को नॅशनल युनिव्हर्सिटी’चे प्राध्यापक पाव्हलो शिदलोव्स्की यांनी या घरांच्या रचनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या घरांचा पाया मजबूत करण्यासाठी ‘मॅमथ’च्या कवट्या आणि मोठी लांब हाडे जमिनीत उभी रोवली जात असत. घराच्या वरच्या भागासाठी लाकडी सांगाडा वापरला जाई, जो प्राण्यांच्या कातड्याने किंवा बर्च झाडाच्या सालीने झाकला जात असे. वार्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि छताला वजन देण्यासाठी ‘मॅमथ’चे सुळे आणि मोठी चपटी हाडे छतावर ठेवली जात असत. या जागेचे उत्खनन सर्वप्रथम 1966 ते 1974 दरम्यान करण्यात आले होते.
मात्र, ही घरे नेमकी किती काळ वापरली गेली, याबाबत स्पष्टता नव्हती. नुकत्याच झालेल्या ‘कार्बन डेटिंग’नुसार, मेझिरीच येथील सर्वात मोठी वास्तू साधारण 18,323 ते 17,839 वर्षांपूर्वीची आहे. हा काळ हिमयुगातील सर्वात थंड कालखंड संपल्यानंतरचा आहे. हे निवारे कायमस्वरूपी वस्ती नसून, केवळ जगण्यासाठी शोधलेला एक ‘व्यावहारिक पर्याय’ होता, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. संशोधनानुसार, ही घरे साधारणपणे 429 वर्षांपर्यंत वापरली गेली असावीत. हे संशोधन ‘ओपन रिसर्च युरोप’ या प्लॅटफॉर्मवर 21 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाले आहे. मानवाने निसर्गातील उपलब्ध संसाधनांचा वापर करून संकटावर कशी मात केली, याचे हे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे.