Mood-Regulating Hormones | माणसाचा मूड ठरवणारे हार्मोन्स

Mood-Regulating Hormones |
Mood-Regulating Hormones | माणसाचा मूड ठरवणारे हार्मोन्स
Published on: 
Updated on: 

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात काही ना काही वैशिष्ट्ये असतात, ज्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरते. या मागील शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या शरीरातील ‘न्यूरोट्रांसमीटर्स’ आणि ‘हार्मोन्स’, जे मानवी वर्तनावर आणि मनःस्थितीवर थेट प्रभाव पाडतात. हे हार्मोन्स आणि न्यूरोट्रांसमीटर्स नेमके कसे काम करतात, याविषयी सविस्तर माहिती:

मेंदूचे कार्य कसे चालते?

मानवी मेंदू एखाद्या संगणकाप्रमाणे (कॉम्प्युटर) कार्य करतो. मेंदूमध्ये काही विशेष संदेशवाहक असतात, जे एखाद्या वायरिंगप्रमाणे संपूर्ण शरीरात पसरलेले असतात. यांना ‘न्यूरोट्रांसमीटर्स’ म्हटले जाते. यांच्या साहाय्याने मेंदू शरीराच्या विविध अवयवांपर्यंत संदेश पोहोचवतो. वाढते वय, गंभीर आजार किंवा औषधांचे दुष्परिणाम यामुळे मेंदूतील हे न्यूरोट्रांसमीटर्स हळूहळू कमी होऊ लागतात.

डोपामाइन (Dopamine) :

डोपामाइन हा एकाग्रता, स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि समस्या निवारण कौशल्य वाढवणारा न्यूरोट्रांसमीटर्स आहे. यामुळे व्यक्तीला नवीन काम करण्याची प्रेरणा मिळते. एखादे उद्दिष्ट पूर्ण करताना हा हार्मोन वेगाने सक्रिय होतो. उत्तम झोपेसाठीही हा घटक उपयुक्त ठरतो. डोपामाइनची कमतरता निर्माण झाल्यास व्यक्ती नैराश्यात (डिप्रेशन) जाऊ शकते. व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये या हार्मोनची तीव्र कमतरता आढळते.

सेरोटोनिन (Serotonin):

सेरोटोनिन हा सकारात्मक ऊर्जा देणारा हार्मोन आहे. भूक, झोप आणि लैंगिक इच्छा नियंत्रित करण्यात याची महत्त्वाची भूमिका असते. शरीरात सेरोटोनिनची पातळी योग्य असल्यास व्यक्ती आनंदी आणि कार्यक्षम राहते. मात्र, याची कमतरता नैराश्याला कारणीभूत ठरू शकते, तर याचे अतिरिक्त प्रमाण अति-उत्साह (हायपो-मेनिया) आणि तीव्र रागास कारणीभूत ठरते.

नॉरॲड्रेनालिन (Noradrenaline):

हा हार्मोन व्यक्तीमध्ये तत्काळ उत्साह आणि ऊर्जा निर्माण करतो. खेळाच्या मैदानावरील खेळाडू किंवा युद्धातील सैनिकांच्या मेंदूमध्ये याचे प्रमाण वाढते. हा हार्मोन रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवतो. याची कमतरता जाणवल्यास थकवा येतो, तर अतिरिक्त प्रमाणामुळे उच्च रक्तदाबाचा (हाय बीपी) त्रास संभवतो.

ऑक्सिटोसिन (Oxytocin):

ऑक्सिटोसिन हा विश्वास, प्रेम, काळजी आणि आशेच्या भावनेशी जोडलेला हार्मोन आहे. मानवासह सर्व सस्तन प्राण्यांमध्ये हा आढळतो. महिलांच्या प्रसूतीदरम्यान हा हार्मोन नैसर्गिकरीत्या स्रवतो, ज्यामुळे प्रसूती सुलभ होते. तसेच स्तनपानासाठी लागणाऱ्या दूधनिर्मितीतही याची मुख्य भूमिका असते. बाळाच्या जन्मानंतर आई आणि बाळामधील भावनिक नाते याच हार्मोनमुळे घट्ट होते. याची पातळी कमी झाल्यास नैराश्य येऊ शकते, तर सकारात्मक विचारांमुळे याचे प्रमाण वाढते.

एंडॉर्फिन्स (Endorphins):

मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीमधून सुमारे २० प्रकारचे एंडॉर्फिन्स स्रवतात. हे शरीरासाठी नैसर्गिक ‘पेनकिलर’ (वेदनानाशक) म्हणून काम करतात. शरीराला कुठेही वेदना झाल्यास किंवा आणीबाणीच्या प्रसंगी मेंदू मोठ्या प्रमाणात एंडॉर्फिन तयार करतो, ज्यामुळे वेदना सहन करण्याची ताकद मिळते. महिलांना प्रसूती वेदना सहन करण्याचे बळही याच हार्मोनमुळे मिळते.

कोर्टिसोल (Cortisol):

शरीरातील आनंदी हार्मोन्सची पातळी कमी होते, तेव्हा कोर्टिसोल सक्रिय होतो. यामुळे तात्पुरता मानसिक ताण निर्माण होतो, मात्र ही प्रक्रिया व्यक्तीला समस्येवर तोडगा शोधण्यास प्रवृत्त करते.

प्रजननक्षमतेशी जोडलेले हार्मोन्स :

पौगंडावस्थेत मुलींच्या शरीरात इस्ट्रोजेन (Estrogen) आणि प्रोजेस्टेरॉन (Progesterone) हे हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे शारीरिक विकास होतो आणि त्यांच्यात संवेदनशीलता व संयम यांसारखे गुण विकसित होतात. मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हा हार्मोन नेतृत्व आणि धाडस यांसारखे पुरुषी गुण विकसित करतो. स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही विरुद्ध लिंगाशी संबंधित हार्मोन्स मर्यादित प्रमाणात सक्रिय असतात, जे व्यक्तिमत्त्वाला समतोल ठेवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news