Honeycomb Pattern | मंगळावर दिसले चक्क ‘मधाचे पोळे’?

१४ वर्षे जुन्या रोव्हरने पाठवला फोटो; वैज्ञानिकही चक्रावले!
Honeycomb Pattern |
Honeycomb Pattern | मंगळावर दिसले चक्क ‘मधाचे पोळे’?
Published on
Updated on

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहावर परग्रहावरील जीवांचे (Aliens) वास्तव्य आहे की, या लाल ग्रहाने स्वतःच्या पोटात असे काही रहस्य दडवून ठेवले आहे, ज्यापासून मानव अजूनही अनभिज्ञ आहे? अंतराळ जगतातून पुन्हा एकदा अशीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे, ज्याने जगभरातील वैज्ञानिकांना थक्क केले आहे. नासाच्या ‘क्युरियोसिटी रोव्हर’ने मंगळाच्या वाळवंटी पृष्ठभागावर एक अत्यंत विचित्र आकृती कॅमेऱ्यात कैद केली आहे, जी हुबेहूब मधाच्या मोठ्या पोळ्यासारखी दिसते.

गेल्या १४ वर्षांपासून लाल ग्रहावर संशोधन करणाऱ्या या रोव्हरने पाठवलेल्या नवीन फोटोमुळे विज्ञान जगतात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. कोट्यवधी मैल दूर असलेल्या या निर्जन ग्रहावर हा जादुई पॅटर्न कसा तयार झाला, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. नासाच्या ब्लॉगनुसार, क्युरियोसिटी रोव्हरने हा थक्क करणारा फोटो मंगळावरील 'गेल क्रेटर' या भागात काढला आहे. जेव्हा वैज्ञानिकांनी या भागाचे फोटो पाहिले, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. येथील जमिनीवर मोठे ‘पॉलीगोनल’ म्हणजेच अनेक कोन असणाऱ्या रचना तयार झाल्या आहेत, ज्या वरून पाहिल्यावर अगदी मधाच्या पोळ्यासारख्या दिसतात. हा अनोखा पॅटर्न नेमका कसा तयार झाला, याचे कोणतेही ठोस उत्तर सध्या शास्त्रज्ञांकडे नाही.

मात्र, यामागे काही सिद्धांत मांडले जात आहेत: पृथ्वीसारखे बदल: आपल्या पृथ्वीवरही सुकलेली आणि फाटलेली माती, गोठलेली खनिजे किंवा वारंवार बर्फ वितळल्यामुळे आणि गोठल्यामुळे अशा आकृत्या तयार होतात. मंगळावरही कोट्यवधी वर्षांपूर्वी असाच काहीसा बदल झाला असावा, असा अंदाज आहे. हवामानाचा प्रभाव: मंगळाचा इतिहास अब्जावधी वर्षे जुना आहे. तिथे झालेले ज्वालामुखीचे उद्रेक, वाहते पाणी, वाऱ्याचे झोत आणि तीव्र हवामान बदल यापैकी कोणतेही कारण या रचनेसाठी कारणीभूत असू शकते. या ठिकाणी केवळ मधाच्या पोळ्यासारखा पॅटर्नच नाही, तर तिथे विखुरलेले गडद काळ्या रंगाचे दगड देखील वैज्ञानिकांसाठी एक मोठे कोडे बनले आहेत. रोव्हरने येथील ‘कोर्टाडेरा’ नावाच्या काळ्या दगडाची आणि या आकृत्यांची तपासणी आपल्या हाय-टेक कॅमेरा आणि लेझर टूल्सच्या साहाय्याने केली आहे.

वैज्ञानिक अंदाज : हे काळे दगड एक तर उंच पर्वतांवरून तुटून खाली पडले असावेत किंवा लाखो वर्षांपूर्वी अंतराळातून कोसळलेल्या एखाद्या प्राचीन उल्कापिंडाचा भाग असावेत. यापूर्वीही मंगळावर असे काळे दगड सापडले होते, ज्यामध्ये ‘निकेल’ धातू आढळला होता. निकेल हा धातू प्रामुख्याने उल्कापिंडांमध्येच आढळतो. २०१२ मध्ये मंगळ ग्रहावर लँडिंग केल्यापासून क्युरियोसिटी रोव्हर तिथे सातत्याने जीवसृष्टीचे पुरावे शोधत आहे. १४ वर्षे उलटून गेल्यानंतरही मंगळ ग्रह नवनवीन रहस्यांनी वैज्ञानिकांना आव्हान देत आहे. हे मधाच्या पोळ्यासारखे स्ट्रक्चर आणि तिथे सापडलेले काळे दगड या दोन्ही गोष्टी एकाच घटनेशी संबंधित आहेत की वेगवेगळ्या, याचा सखोल अभ्यास आता वैज्ञानिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news