पंधरा लाख वर्षांपूर्वीच्या पूर्वजांबरोबर होती आणखी एक मानव प्रजाती

होमो इरेक्टस् मानवांबाबत आता एक नवे संशोधन
Homo erectus
होमो इरेक्टस् मानवांबाबत आता एक नवे संशोधन Pudhari File Photo
Published on
Updated on

नैरोबी : होमो सेपियन्स या बुद्धिमान मनुष्य प्राण्याला आधुनिक मानवांचा पूर्वज मानले जाते. हा टप्पा गाठण्यापूर्वी मानवाचे पूर्वज होमो हॅबिलिस (हाताचा कुशलतेने वापर करणारे) आणि होमो इरेक्टस् म्हणजेच पाठीचा कणा ताठ ठेवून चालणारे अशा काही टप्प्यांमधून विकसित होत आले होते. यापैकी होमो इरेक्टस् मानवांबाबत आता एक नवे संशोधन झाले आहे. 15 लाख वर्षांपूर्वीच्या काही पाऊलखुणांवरून असे दिसून आले आहे की, आपल्या होमो इरेक्टस् या पूर्वजांसमवेत सध्या लुप्त झालेली अन्य एक मनुष्य प्रजाती राहत होती. केनियातील कुबी फोरा या ठिकाणी दोन पायांवर चालणारी ‘पॅरान्थ्राेपस बोईसेई’ ही लुप्त प्रजाती अस्तित्वात होती.

केनियामध्ये मनुष्य विकसित होण्यापूर्वीच्या दोन वेगवेगळ्या प्रजाती अस्तित्वात होत्या, हे आता या पाऊलखुणांवरून दिसून आले. अमेरिकेतील पेनसिल्वानियामधील चाथम युनिव्हर्सिटीतील पॅलिओअँथ्राेपोलॉजिस्ट केवीन हटाला यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या भूभागावर या दोन्ही प्रजातींना एकमेकींच्या अस्तित्वाची जाणीव असावी, असे मला वाटते. मात्र, आपण ‘वेगळे’ आहोत हे सुद्धा त्यांनी कदाचित ओळखलेले असावे. हटाला आणि त्यांच्या टीमने केनियातील या पावलांच्या ठशांचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण केले. 2021 मध्ये लेक तुर्कानाच्या पूर्व काठावरील कुबी फोरा नावाच्या ठिकाणी या पाऊलखुणा आढळल्या होत्या व त्यावेळेपासून तिथे संशोधन सुरू होते. आता याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘सायन्स’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. यापूर्वीही पूर्व आफ्रिकेत अनेक ठिकाणी पावलांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामध्ये टांझानियामधील लेटोली येथील प्रसिद्ध ट्रॅकवेचा समावेश होतो. हे ठसे 3.6 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या ‘ल्युसी’ या पूर्वज महिलेच्या ‘ऑस्ट्रेलोपिथेकस अफेरेन्सिस’ या प्रजातीचे होते. ऑस्ट्रेलोपिथेकसमधूनच ‘होमो’ हे जीनस विकसित झाले होते. मात्र, कुबी फोरा ट्रॅकवेवर संशोधकांना काही तरी नवे, वेगळे दिसून आले. या ठिकाणी दोन पायांवर चालणार्‍या जीवांच्या वेगवेगळ्या पाऊलखुणा दिसून आल्या. 30 लाख वर्षांच्या काळात या ठिकाणी मानवाच्या वेगवेगळ्या प्रजातींचा निवास घडला होता. त्यामध्ये ऑस्ट्रेलोपिथेसिन्सच्या दोन, तर होमो जीनसमधील चार सदस्यांच्या जीवांचा समावेश होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news