

बीजिंग : घरातील कामे सोपी व्हावीत, असे जवळपास प्रत्येकाला वाटते. प्रत्येकाची ही गरज ओळखून अनेक कंपन्या विविध प्रकारच्या गॅजेटस् आणत आल्या आहेत. आतापर्यंत ठरावीक कामे करणारे गॅजेट आणल्या जात होत्या. पण, आता घरकाम करून आवश्यकतेनुरूप शॉपिंग देखील करू शकेल, असा एक रोबो एका चिनी कंपनीने आणला असून, याहून आश्चर्याची बाब म्हणजे हा रोबो चीनमध्ये आता भाड्यानेही मिळू लागला आहे.
चीनमधील एका इन्फ्लुएंसरने याचे उत्तम उदाहरण देत स्वयंपाक, साफसफाई आणि सोबत डेटवर जाण्यासाठी असा मानवी रोबो भाड्याने घेतला आहे. या रोबोचे एका दिवसाचे भाडे इतके आहे की, ऐकून कोणीही थक्क होईल. या रोबोचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. न्यूयॉर्क विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतलेला 25 वर्षीय झांग जेनयुआन 2022 मध्ये एका डेटिंग रिअॅलिटी शोमध्ये दिसल्यानंतर प्रसिद्ध झाला. आता तो प्रवासवृत्तांत सोशल मीडियावर शेअर करतो, जिथे त्याचे 1.4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
13 मार्च रोजी झांगने जी-1 नावाच्या रोबोसोबत एका दिवसाचा व्हिडीओ शेअर केला, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा रोबो भाड्याने घेण्यासाठी त्याने तब्बल 10,000 युआन (1.2 लाख रुपये) खर्च केले. जी-1 हा चीनमधील युनिट्री रोबोटिक्स कंपनीनेसादर केलेला अत्याधुनिक मानवी रोबोट आहे. 127 सेंमी उंचीचा आणि 35 किलो वजनाचा हा रोबोट केवळ घरगुती कामेच करू शकत नाही, तर मार्शल आर्टस्ही शिकलेला आहे. चीनमध्ये अनेक सेवा पुरवठादार हा रोबोट भाड्याने देत आहेत. जी-1 च्या एका दिवसाच्या भाड्याचा दर 1 लाख ते 1.8 लाख रुपयांपर्यंत आहे.