Veeraswamy restaurant: लंडनमधील ऐतिहासिक ‌‘वीरस्वामी‌’ रेस्टॉरंटवर संकट

लंडनमधील आणि युनायटेड किंगडममधील सर्वात जुने भारतीय रेस्टॉरंट म्हणून ओळखले जाणारे ‌‘वीरस्वामी‌’ सध्या अनिश्चित भवितव्याच्या छायेत आहे
Veeraswamy restaurant
Veeraswamy restaurantPudhari
Published on
Updated on

लंडन : लंडनमधील आणि युनायटेड किंगडममधील सर्वात जुने भारतीय रेस्टॉरंट म्हणून ओळखले जाणारे ‌‘वीरस्वामी‌’ सध्या अनिश्चित भवितव्याच्या छायेत आहे. रीजंट स्ट्रीटवरील आपल्या मूळ जागेतून जवळपास शतकभर अखंडपणे सुरू असलेले हे रेस्टॉरंट आता स्थलांतराच्या संकटात सापडले आहे. इमारतीचा मालक असलेल्या ‌‘क्राऊन इस्टेट‌’सोबत सुरू असलेल्या वादामुळे ‌‘वीरस्वामी‌’ला आपली ऐतिहासिक जागा सोडावी लागू शकते.

1926 साली स्थापन झालेले ‌‘वीरस्वामी‌’ व्हिक्टरी हाऊस या ग्रेड-॥ सूचीबद्ध इमारतीत कार्यरत आहे. दुसरे महायुद्ध, जर्मन बॉम्बहल्ले (ब्लिट्झ) आणि ब्रिटिश समाजातील मोठे बदल यावर मात करत हे रेस्टॉरंट आजतागायत सुरू राहिले. मात्र, मार्चमध्ये शताब्दी साजरी होण्याच्या आधीच त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, समर्थकांनी राजा चार्ल्स तृतीय यांना हस्तक्षेप करण्याची विनंती करत बकिंगहॅम पॅलेसकडे थेट याचिका नेण्याची तयारी सुरू केली आहे.

‌‘वीरस्वामी‌’ ही ‌‘सामायिक सांस्कृतिक वारशाची जिवंत खूण‌’ असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत 19 हजारांहून अधिक लोकांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या असून, प्रसिद्ध शेफ रेमंड ब्लाँ, मायकेल रू आणि रिचर्ड कॉरिगन यांचा पाठिंबा मिळाला आहे. ‌‘युरोपमधील शहरं त्यांच्या दंतकथात्मक रेस्टॉरंटस्‌‍ जपतात, मग ‌‘वीरस्वामी‌’ गमावण्याचं कारण काय?‌’ असा सवाल कॉरिगन यांनी केला आहे.

वादाचे मुख्य कारण म्हणजे, क्राऊन इस्टेटचा व्हिक्टरी हाऊसच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव. या प्रकल्पात रेस्टॉरंटचा काही भाग कार्यालयांमध्ये रूपांतरित करण्याचा विचार असून, प्रवेशमार्गात बदल होणार आहेत. त्यामुळे रेस्टॉरंट चालवणे अशक्य होईल, असा दावा मालक रंजित माथ्राणी आणि नमिता पंजाबी यांनी केला आहे. कायदेशीर लढाई सुरू असली, तरी शताब्दी वर्ष पूर्ण होण्याआधीच ‌‘वीरस्वामी‌’ बंद पडण्याचा धोका कायम आहे.

एकेकाळी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यासारख्या नेत्यांपासून ते चार्ली चॅप्लिन, विन्स्टन चर्चिल आणि अलीकडच्या काळात राजघराण्यातील सदस्यांपर्यंत अनेक नामवंतांनी येथे भोजन केले आहे. ब्रिटनमध्ये तंदूर ओव्हन आणणे, चिकन कोरमा, विंदालू आणि तंदुरी चिकन लोकप्रिय करणे यात ‌‘वीरस्वामी‌’चा मोलाचा वाटा आहे. 2016 मध्ये मिळालेला मिशेलिन स्टार आजही त्याच्या लौकिकाची साक्ष देतो. समर्थकांना आशा आहे की, समुदायांमधील संबंध मजबूत करण्याची भूमिका घेणारे राजा चार्ल्स या मोहिमेला मूक पाठिंबा देतील. मात्र, बकिंगहॅम पॅलेसने हा विषय क्राऊन इस्टेटच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news