Hira Ratan Manek | पाणी आणि सूर्यप्रकाशावर 411 दिवस जगलेले हिरा रतन मानेक

hira ratan manek survived 411 days on water and sunlight
Hira Ratan Manek | पाणी आणि सूर्यप्रकाशावर 411 दिवस जगलेले हिरा रतन मानेकPudhari File Photo
Published on
Updated on

अहमदाबाद : माणसाला जगण्यासाठी अन्न-पाण्याची गरज असते हे आपल्याला माहिती आहेच; पण यालाही काही माणसं अपवाद ठरलेली आहेत. परमहंस योगानंद यांच्या ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ या आत्मचरित्रात वर्णन असलेल्या बंगालमधील गिरीबाला असोत किंवा 2020 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालेले गुजरातमधील प्रल्हादबाबा जानी असोत, या लोकांनी कधीही अन्न-पाण्याचे सेवन केले नव्हते! आपण कधी विचार केला आहे का, की एखादी व्यक्ती फक्त पाणी आणि सूर्यप्रकाशावर जिवंत राहू शकते? हे ऐकायला एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटासारखे वाटेल; पण भारताच्या हिरा रतन मानेक यांनी हे शक्य करून दाखवले होते. त्यांनी 411 दिवस कोणताही घन आहार न घेता फक्त पाणी आणि सूर्यकिरणांवर आपले जीवन जगले. ही घटना फक्त भारतातच नाही, तर जगभरात चर्चेचा विषय बनली होती.

हिरा रतन मानेक हे पेशाने इंजिनिअर होते आणि त्यांचा जन्म केरळमधील कोझिकोड येथे झाला होता. 2022 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले; पण त्यांची ओळख नेहमीच त्या चमत्कारिक प्रयोगाशी जोडलेली राहील, ज्यात त्यांनी असा दावा केला की, त्यांच्या ऊर्जेचा खरा स्रोत सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्याकडे पाहणे (सनगेझिंग) हा होता. 1995 मध्ये त्यांनी हा अनोखा प्रयोग केला. या काळात ते 411 दिवस घन आहाराशिवाय फक्त पाणी आणि सूर्याच्या ऊर्जेवर अवलंबून राहिले. त्यांच्या या प्रवासावर डॉक्टर आणि वैज्ञानिकांच्या एका मोठ्या टीमने बारकाईने लक्ष ठेवले.

डॉ. सुधीर शाह आणि त्यांच्या टीमने या प्रयोगाची देखरेख केली. 24 डॉक्टरांनी मानेक यांची सतत तपासणी केली आणि त्यांना आढळले की, इतके दिवस उपवास करूनही त्यांचे आरोग्य सामान्य होते. त्यांच्या ब्रेन स्कॅनमध्ये असे दिसून आले की, त्यांची पिनियल ग्लँड (Pineal Gland) सामान्यपेक्षा मोठी होती, मेलाटोनिन (Melatonin) आणि सेरोटोनिन ( Serotonin) ची पातळी वाढलेली होती आणि न्यूरॉन्समध्ये असामान्य हालचाल दिसत होती. याचा अर्थ, भूकेमुळे अशक्त होण्याऐवजी, त्यांचे शरीर अधिक जुळवून घेताना दिसले. हिरा रतन मानेक यांनी त्यांच्या ‘सनगेझिंग’ या पुस्तकात या तंत्राचे आणि तत्त्वज्ञानाचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी 100 हून अधिक देशांमध्ये जाऊन यावर व्याख्याने दिली. 2002 मध्ये नासा आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनियाच्या वैज्ञानिकांनीही त्यांच्यावर अभ्यास केला; पण त्याचा अहवाल कधीही सार्वजनिक झाला नाही.

अनेक लोकांनी सनगेझिंग प्रोटोकॉल स्वीकारल्याचा दावा केला आणि सांगितले की, त्यांना अधिक ऊर्जा, मानसिक स्पष्टता आणि कमी भूक जाणवली; पण वैद्यकीय तज्ज्ञांनी याला छद्म-विज्ञान (pseudo- science) म्हटले आणि इशारा दिला की, कोणताही वैज्ञानिक आधार नसलेल्या अशा प्रयोगांमुळे जीवाला धोका होऊ शकतो. तरीही, आजही एक प्रश्न कायम आहे - जर वनस्पती सूर्यप्रकाशावर जगू शकतात, तर माणूसही असे करू शकतो का? हिरा रतन मानेक यांचा प्रयोग आजही गूढ आणि वादग्रस्त आहे. एका बाजूला, जे लोक विज्ञानाच्या पलीकडील नवीन शक्यतांचा शोध घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ते एक प्रेरणास्थान आहेत, तर दुसर्‍या बाजूला, वैज्ञानिक जग अजूनही त्यांच्या दाव्यांवर शंका व्यक्त करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news