

इस्लामाबाद : पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचं वातावरण आहे. पहलगाममधील नृशंस दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली आहे. पाकिस्तानसारख्या देशात जिथे हिंदू लोकांवर सातत्याने अन्याय होतो, धर्मांतर घडवलं जातं, मंदिरं तोडली जातात, अशा देशात एक हिंदू राजघराणं आहे, जे त्यांच्या शौर्यामुळे, परंपरेमुळे आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये ओळखलं जातं. या राजघराण्याचा व राजाचा तिथे आजही मोठा दबदबा आहे.
सिंध प्रांतातील उमरकोट ही पाकिस्तानातील एकमेव हिंदू रियासत आहे, ज्याने 1947 च्या फाळणीनंतरही आपलं वतन सोडलं नाही. इतर अनेक हिंदू कुटुंबं भारतात स्थलांतरित झाली; पण सोढा राजघराण्याने आपले मूळ ठिकाण सोडले नाही. सध्या या रियासतीचे राजा कुंवर करणी सिंह सोढा आहेत. ते सोढा वंशाचे 27 वे राजा असून, एक अल्पसंख्याक नेतेदेखील आहेत. त्यांचे वडील राणा हमीर सिंह हे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य होते आणि माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांचे निकटवर्तीय होते.
करणी सिंह यांनी 2015 मध्ये राजस्थानच्या कनोटा ठिकाणच्या ठाकूर मानसिंग राठोड यांच्या कन्या पद्मिनी सिंह राठोडसोबत विवाह केला. यामुळे भारतातही त्यांची चर्चा झाली. त्यांच्या आईचा जन्म भारतात झाला असून, त्यांच्या तीन बहिणींची लग्नं भारतात झाली आहेत. त्यामुळे भारताशी त्यांचं नातं फक्त भावनिक नव्हे, तर सांस्कृतिक सेतूसारखं आहे. सोढा घराण्याचं मूळ परमार राजपूत वंशाशी आहे. त्यांच्या पूर्वजांनी सिंध प्रांतातील खीप्रो भागात आपलं राज्य स्थापन केलं आणि नंतर त्यांना ‘राणा’ ही उपाधी मिळाली. 11व्या शतकात राणा अमरसिंह यांनी बांधलेला उमरकोट किल्ला आजही त्यांचं वैभव दर्शवतो.
या परिसरातील शिव मंदिर, काली माता मंदिर आणि इतर हिंदू स्थळं हिंदू परंपरेचं प्रतीक आहेत. जरी पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार होत असले, तरी सोढा राजघराणं आजही भगव्या झेंड्याखाली जगतं. करणी सिंह यांच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये लिहिलं आहे : ‘थारचा गर्वित सुपुत्र, जो सांस्कृतिक वारसा, सामंजस्य आणि समाजाच्या सशक्तीकरणासाठी कार्य करतो.’ करणी सिंह यांचं जीवन हे परंपरा, सांस्कृतिक अस्मिता आणि हिंदू-मुस्लिम एकतेचा मूर्तिमंत आदर्श आहे. ज्या ठिकाणी बहुसंख्य लोकसंख्या हिंदूंविरोधात आहे, तिथंही ते आपला स्वाभिमान जपत आहेत.