

बीजिंग : चीन आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एक लहान 6 G चिप विकसित केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील कमी वेग आणि नेटवर्कची समस्या आता भूतकाळात जमा होऊ शकते. तुमच्या सध्याच्या स्मार्टफोनच्या डाऊनलोड स्पीडपेक्षा ही चिप शेकडो पटींनी वेगवान आहे.
सध्या 5 G वायरलेस कम्युनिकेशनसाठी सर्वोत्तम मानले जाते. ते सहसा 6 गिगाहर्ट्झपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी वापरते, जरी प्रत्येक देशात ही फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. 2025 च्या पहिल्या सहामाहीत अमेरिकेतील सर्वात वेगवान सेल्युलर नेटवर्कने 299.36 मेगाबाईट्स प्रति सेकंद इतका 5 G डाऊनलोड स्पीड दिला होता. दुसरीकडे 6 G तंत्रज्ञान 2030 पर्यंत तयार होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 6 G मध्ये अनेक फ्रिक्वेन्सी बँड वापरले जातील आणि त्याचा वेग 5 G पेक्षा 10,000 पटीने जास्त असू शकतो. मात्र 6 G तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी डिव्हाईसना वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी बँडसाठी अनेक कंपोनंटस्ची गरज भासेल, जे सध्याच्या उपकरणांमध्ये नाहीत.
आता संशोधकांनी 0.07 बाय 0.43 इंच (1.7 बाय 11 मिलिमीटर) मापाच्या एका चिपमध्ये 0.5 ते 110 गिगाहर्ट्झपर्यंतच्या नऊ रेडिओ-फ्रिक्वेन्सी (RF) बँड्ससह संपूर्ण वायरलेस स्पेक्ट्रम समाविष्ट केला आहे. या नवीन चिपमध्ये प्रति सेकंद 100 गिगाबाईट्सपेक्षा जास्त डेटा ट्रान्सफर करण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे, ज्या ग्रामीण भागात इंटरनेटचा वेग नेहमीच कमी असतो, तिथेही ही चिप चांगला वेग देऊ शकते.
संशोधकांना असेही आढळले की, संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये कम्युनिकेशन स्थिर राहिले. त्यांचे हे संशोधन ‘नेचर’ नावाच्या जर्नलमध्ये 27 ऑगस्ट रोजी प्रकाशित झाले आहे. या डेटा स्पीडचा अर्थ असा आहे की, या चिपसह 1,000 स्मार्टफोन एकाच वेळी 8 K अल्ट्रा हाय डेफिनिशन व्हिडीओ कोणत्याही अडथळ्याशिवाय पाहू शकतील, अशी माहिती चीनच्या सरकारी माध्यम ‘शिन्हुआ’ने दिली आहे.