

लंडन : सध्याच्या फॅशन दुनियेत महिलांच्या हाय हिल्स म्हणजेच उंच टाचेच्या चपलांना मोठाच भाव आहे. काळाच्या ओघात हिल्सच्या डिझाईनमध्ये अनेक बदल होत गेले. उंच टाचेचे चप्पल किंवा बूट अनेक महिलांसाठी स्टाईल व आकर्षणाचा विषय असतात. मात्र, अनेकांना हे माहिती नसेल की, असे उंच टाचेचे चप्पल किंवा बूट सुरुवातीला महिलांसाठी नव्हे, तर चक्क पुरुषांसाठी बनवण्यात आले होते!
अशा हिल्सची सुरुवात दहाव्या शतकात झाली. त्यावेळी सर्वप्रथम पर्शियन म्हणजेच सध्याच्या इराणमध्ये असलेल्या प्राचीन पर्शिया साम्राज्यातील घोडेस्वारांनी असे हिल्स वापरण्यात सुरुवात केली होती. घोड्यावर स्वार होऊन आपले पाय रकाबमध्ये स्थिर ठेवण्यासाठी त्यांना उंच टाचेच्या चप्पलांची आवश्यकता होती. त्यामुळे या चपलांचे डिझाईन असे बनवण्यात आले की, घोडेसवारी करीत असताना संतुलन बनवण्यासाठी या चपलांची मदत होईल. काळाच्या ओघात अशा चपलांचा ट्रेंड युरोपमध्ये पोहोचला व सोळाव्या शतकात पुरुषांच्या फॅशनचा एक महत्त्वाचा भाग बनला. युरोपमध्ये असे उंच टाचेचे बूट किंवा चप्पल परिधान करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले होते.
फ्रान्सचा राजा चौदाव्या लुईनेही आपल्या शाही परिधानामध्ये अशा बुटाला स्थान दिले होते. त्याचे बुटाचे हिल्स सहसा लाल रंगाचे असत. ते त्याची शक्ती व प्रतिष्ठेचे रूपक होते. सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत हिल्सची लोकप्रियता महिलांमध्येही वाढली. हळूहळू महिलाही पुरुषांच्या फॅशनपासून प्रेरित होऊन उंच टाचेची पादत्राणे परिधान करू लागल्या. युरोपमध्ये ही फॅशन वाढली आणि हळूहळू अठराव्या शतकात पुरुषांमध्ये असे चप्पल परिधान करणे कमी होत जाऊन महिलांमध्ये त्याचे प्रमाण वाढले. 19 व्या व विसाव्या शतकात उंच टाचेचे चप्पल हे महिलांच्या फॅशनचा एक महत्त्वाचा भाग बनले.