

मोआब (उटाह) : निसर्गाच्या अफाट शक्तीने लाखो वर्षांच्या कालावधीत कोरलेली कलाकृती पाहायची असेल, तर अमेरिकेतील उटाह राज्य हे जगातील सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. येथील ‘आर्चिस नॅशनल पार्क’मध्ये वार्याच्या आणि पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेल्या दोन हजारहून अधिक नैसर्गिक लाल रंगाच्या दगडी कमानी पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरल्या आहेत.
या कमानींचा इतिहास सुमारे 30 कोटी वर्षांपूर्वी सुरू झाला. एकेकाळी येथे समुद्र होता, ज्याच्या मागे उरलेल्या क्षारांच्या थरांवर वाळूचे खडक साचले. जमिनीच्या हालचालींमुळे हे थर वर आले आणि त्यानंतर पाऊस, बर्फ आणि वेगाने वाहणार्या वार्यामुळे या खडकांची झीज होऊन त्यांना कमानींचा आकार प्राप्त झाला. ‘डेलिकेट आर्च’ ही या उद्यानातील सर्वात प्रसिद्ध कमान आहे. सुमारे 52 फूट उंच असलेली ही कमान उटाह राज्याचे अधिकृत प्रतीक मानली जाते.
लँडस्केप आर्च ही जगातील सर्वात लांब नैसर्गिक कमानींपैकी एक असून, तिची लांबी सुमारे 290 फूट आहे. ही कमान अत्यंत अरुंद असल्याने भविष्यात ती कधीही कोसळू शकते, असा अंदाज वर्तवला जातो. ‘डबल आर्च’ येथे दोन विशाल कमानी एकाच पायातून वर आल्याचे पाहायला मिळते, जे विज्ञानाच्या द़ृष्टीने दुर्मीळ मानले जाते. हे राष्ट्रीय उद्यान केवळ दिवसाच्या सौंदर्यासाठीच नाही, तर रात्रीच्या आकाश दर्शनासाठी देखील प्रसिद्ध आहे.
या उद्यानाला ‘इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क’चा दर्जा मिळाला असून, दगडी कमानींच्या पार्श्वभूमीवर आकाशगंगा पाहण्यासाठी जगभरातील खगोलप्रेमी आणि छायाचित्रकार येथे गर्दी करतात. वाढत्या पर्यटनामुळे या नाजूक नैसर्गिक वास्तूंचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने काही नियम कडक केले आहेत. पर्यटकांना या कमानींवर चढण्यास सक्त मनाई आहे. तसेच, बदलत्या हवामानामुळे या कमानींची नैसर्गिकरीत्या झीज होत असून, काळाच्या ओघात काही कमानी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.