Heart disease prediction | हृदयविकाराचे भाकीत वर्तवणारी यंत्रणा भारतात अपयशी!

80 टक्के रुग्णांचा धोका ओळखण्यात कॅल्क्युलेटर फेल
Heart disease prediction |
Heart disease prediction | हृदयविकाराचे भाकीत वर्तवणारी यंत्रणा भारतात अपयशी!
Published on
Updated on

नवी दिल्ली : तुम्ही तुमची जीवनशैली आणि आरोग्य तपासून हृदयविकाराचा धोका मोजत असाल, तर सावधान! जगभरात वापरले जाणारे हृदयविकाराचे रिस्क कॅल्क्युलेटर भारतीय रुग्णांच्या बाबतीत अपयशी ठरत असल्याचे एका खळबळजनक संशोधनातून समोर आले आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या तब्बल 80 टक्के भारतीयांना या यंत्रणेने आधी हाय रिस्क (धोकादायक) श्रेणीत ठेवलेच नव्हते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

गोविंद वल्लभ पंत इन्स्टिट्यूट, फरिदाबादचे ईएसआयसी मेडिकल कॉलेज आणि एम्स मधील तज्ज्ञांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे. कम्पॅरिझन ऑफ रिस्क प्रेडिक्शन मॉडेल्स या शीर्षकाखाली करण्यात आलेल्या या संशोधनात 4,975 अशा रुग्णांचा अभ्यास करण्यात आला, ज्यांना आयुष्यात पहिल्यांदाच हृदयविकाराचा झटका (स्टेमी) आला होता. त्यावेळी जागतिक स्तरावर वापरल्या जाणार्‍या 5 प्रमुख रिस्क मॉडेल्सच्या आधारे तपासणी केली असता, धक्कादायक निकाल हाती आले. ज्या रुग्णांना प्रत्यक्षात हृदयविकाराचा झटका आला, त्यापैकी 80 टक्के रुग्णांना या मॉडेल्सनी आधी कमी धोक्याचे किंवा सामान्य ठरवले होते. पाश्चात्य देशांतील लोकांसाठी बनवलेली ही मॉडेल्स दक्षिण आशियाई, विशेषतः भारतीयांच्या शरीररचना आणि जीवनशैलीनुसार अचूक ठरत नाहीत. पाचही प्रमुख मॉडेल्समध्ये रुग्णांचे वर्गीकरण करताना मोठी तफावत आढळली, त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

यंत्रणा का ठरतेय अपयशी?

तज्ज्ञांच्या मते, भारतीयांमध्ये हृदयविकाराची कारणे केवळ वय किंवा कोलेस्टेरॉलपुरती मर्यादित नसून, त्यात अनुवांशिकता, आहारातील बदल आणि वाढते प्रदूषण यांसारख्या स्थानिक घटकांचा मोठा वाटा आहे. सध्याची जागतिक मॉडेल्स या भारतीय घटकांचा विचार करत नाहीत, त्यामुळे भविष्यातील संकटाचा अंदाज वर्तवण्यात ती तोकडी पडत आहेत. भविष्यातील गरज भारतात हृदयविकाराचे प्रमाण तरुण वयातच वाढत आहे. अशा परिस्थितीत भारतीयांसाठी खास आणि स्वतंत्र रिस्क प्रेडिक्शन मॉडेल विकसित करण्याची गरज या संशोधनातून व्यक्त करण्यात आली आहे. केवळ जागतिक आकड्यांवर विसंबून न राहता, भारतीयांनी आपली आरोग्य तपासणी आणि जीवनशैलीकडे अधिक गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. ही मॉडेल्स आपल्यासाठी पूर्णपणे अचूक नाहीत, हे आता सिद्ध झाले आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news