

न्यू जर्सी : आजच्या डिजिटल युगात डझनावारी अॅप्स आणि वेबसाईटस्चे पासवर्ड लक्षात ठेवणे डोकेदुखी ठरत आहे. फिंगरप्रिंट आणि फेस-आयडीमुळे हे काम थोडे सोपे झाले असले, तरी डेटा चोरीचा धोका कायम असतो. यावर उपाय म्हणून वैज्ञानिकांनी आता सुरक्षेचे असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे थेट तुमच्या शरीरातील हाडांच्या रचनेशी आणि हृदयाच्या ठोक्यांशी जोडलेले असेल.
न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, टेम्पल युनिव्हर्सिटी आणि टेक्सास A& M युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एकत्रितपणे ‘VitalID’ नावाचे क्रांतिकारी तंत्रज्ञान तयार केले आहे. हे तंत्रज्ञान तुमच्या श्वासोच्छ्वासातून आणि हृदयाच्या ठोक्यांतून निर्माण होणार्या सूक्ष्म कंपनांचा वापर करते. ही कंपने मानेवाटे तुमच्या डोक्यापर्यंत पोहोचतात. प्रत्येक व्यक्तीच्या हाडांची बनावट आणि ऊती वेगळ्या असल्याने, या कंपनांचा पॅटर्न फिंगरप्रिंटप्रमाणेच पूर्णपणे ‘युनिक’ असतो. या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी ग्राहकांना कोणतेही नवीन उपकरण खरेदी करावे लागणार नाही.