

लंडन : निरोगी राहण्यासाठी रोज 10,000 पावले चालण्याचा सल्ला अनेकजण देतात आणि फिटनेस ट्रॅकर्स वापरणारे बहुतांश लोक हे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ‘द लॅन्सेट पब्लिक हेल्थ’ या प्रसिद्ध वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, रोज केवळ 7,000 पावले चालण्यानेही आरोग्याला मोठे फायदे मिळू शकतात. या सवयीमुळे हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या गंभीर आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. एवढेच नाही, तर केवळ 4,000 पावले चालणेही पूर्णपणे निष्क्रिय राहण्यापेक्षा (दिवसाला 2000 पावलांपेक्षा कमी चालणे) आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचे या संशोधनात म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून फिटनेससाठी रोज 10,000 पावले चालण्यावर भर दिला जात आहे. अनेक लोक फिटबिट, पल वॉच किंवा मोबाईल अॅप्सद्वारे आपली रोजची पावले मोजतात; पण हे 10,000 पावलांचे ध्येय कोणत्याही ठोस वैज्ञानिक पुराव्यावर आधारित नव्हते. याच पार्श्वभूमीवर, पावलांची संख्या आणि आरोग्यावरील परिणाम यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी हा नवीन अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात 16,000 हून अधिक लोकांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. संशोधकांनी लोकांच्या चालण्याच्या सवयीचा संबंध आठ प्रमुख आरोग्य समस्यांशी जोडला, ज्यात कर्करोग, हृदयविकार, मधुमेह आणि मानसिक आरोग्य यांचा समावेश होता.
विश्लेषणानंतर संशोधकांना असे आढळले की, जे लोक दररोज सुमारे 7,000 पावले चालतात, त्यांच्यामध्ये अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
अकाली मृत्यूचा धोका : 47 % नी कमी
हृदयविकाराचा धोका : 25 % नी कमी
स्मृतिभ्रंशाचा धोका : 38 % नी कमी
नैराश्याचा धोका : 22 % नी कमी
पडण्याचा धोका : 28 % नी कमी
टाईप 2 मधुमेहाचा धोका : 14 % नी कमी
कर्करोगाचा धोका : 6 % नी कमी
या अभ्यासाच्या प्रमुख आणि सिडनी विद्यापीठाच्या प्राध्यापिका मेलोडी डिंग यांनी सांगितले, आजकाल लोक सहजपणे पावले मोजू शकतात, त्यामुळे त्यांना आरोग्यासाठी नेमके किती चालावे हे जाणून घ्यायचे असते. आमचा अभ्यास लोकांना एक सोपे आणि वैज्ञानिकद़ृष्ट्या सिद्ध झालेले ध्येय देतो. किती मिनिटे व्यायाम केला हे मोजण्यापेक्षा किती पावले चालला, हे लक्षात ठेवणे लोकांना सोपे जाते. त्यामुळे आता 10,000 पावलांच्या आकड्याचा ताण न घेता, रोज 7,000 पावले चालण्याचे सोपे ध्येय ठेवूनही तुम्ही निरोगी आयुष्याकडे एक मोठे पाऊल उचलू शकता.