

नवी दिल्ली : हिरव्या मिरचीचा वापर आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारे असतो. कांदेपोह्यांसारख्या नाश्त्याच्या अनेक प्रकारांमध्ये मिरची वापरली जाते. मिरचीचे लोणचे, तळलेली मिरची, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खर्डा असे अनेक पदार्थ असतात. मिरची अन्न झणझणीत आणि चविष्ट बनवण्यास मदत करतेच, शिवाय हिरव्या मिरचीचे सेवन आरोग्यासाठीही चांगले मानले जाते. हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन ए, बी 6, सी, लोह, तांबे, पोटॅशियम, प्रथिने व कार्बोहायड्रेट्स, बीटा कॅरोटीन, क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीन झेक्सॅन्थिन यांसारखे पोषक घटक आढळतात, जे शरीराला अनेक फायदे देण्यास मदत करतात.
हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन-ए आढळते, जे द़ृष्टी सुधारण्यास व डोळे निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. हिरवी मिरची अँटी-ऑक्सिडंटस्चा चांगला स्रोत आहे. हिरव्या मिरच्यांमध्ये भरपूर प्रमाणात आहारातील फायबर असतात, जे पचनासाठी फायदेशीर ठरू शकतात. हिरव्या मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंटस् गुणधर्म भरपूर असण्याबरोबर त्यात कॅलरीज नसतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज हिरव्या मिरच्यांचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते. मिरच्यांमध्ये आढळणारे कॅप्सेसिन हे संयुग शरीरातील वेदना कमी करू शकते. हे संयुग आपल्या मज्जासंस्थेत प्रवेश करते आणि वेदना कमी करते. हिरवी मिरची खाल्ल्याने अॅसिड रिफ्लक्समुळे जी छातीत जळजळ होते, त्यापासूनही आराम मिळू शकतो. हिरव्या मिरच्यांचे सेवन केल्याने शरीरात जमा होणारे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. तसेच हिरव्या मिरच्यांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही हिरवी मिरची प्रभावी मानली जाऊ शकते. हिरव्या मिरच्यांमध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते.