

हैदराबाद : काही माणसं सडपातळ असतात, पण त्यांचा आहार दांडगा असतो. अशाच काही स्त्री-पुरुषांचे अफाट खाण्याचे व्हिडीओही समोर येत असतात. यापैकी काहींनी विश्वविक्रमही नोंदवलेले आहेत. अशाच एका माणसाने आता हैदराबादी दम बिर्याणी सफाचट केली व तीही तब्बल 8 किलोंची! तो अशी 8 किलो बिर्याणी खात असतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
भारतात बिर्याणीचे शौकीन काही कमी नाहीत. त्यातही हैदराबादी दम बिर्याणी देश-विदेशात प्रसिध्द आहे. मात्र बिर्याणी किंवा कोणताही खाद्यपदार्थ खाण्याची माणसाची एक मर्यादा असते. या माणसाने मात्र अशा सर्व मर्यादा ओलांडून जणू काही परातभर असलेली ही बिर्याणी फस्त केली. या व्हिडीओत दिसते की हा माणूस एका रेस्टॉरंटमध्ये टेबलजवळ बसलेला असतो. त्याच्यासमोर प्लेटमध्ये एक व्यक्ती भांडंभर बिर्याणी ओतते. त्यानंतर हा माणूस मूठ-मूठ भरून ही बिर्याणी तोंडात घालू लागतो. अर्थातच त्याला हे ताट संपवण्यासाठी थोडा वेळ लागला व अधूनमधून तो पाणी किंवा शीतपेयं घेत होता.
हळूहळू त्याने हे सर्व ताट स्वच्छ केलं! इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्या परदेशी माणसाने ही बिर्याणी खाल्ली त्याने यापूर्वीही मोठ्या प्रमाणात विविध खाद्यपदार्थ खाऊन त्याचे व्हिडीओ शेअर केलेले आहेत. त्याने म्हटले आहे की ‘मी हाताने खाण्यात कुशल नाही, पण बिर्याण खाण्यात माझा हातखंडा आहे!’