harry-houdini-the-greatest-magician-in-the-world
‘हा’ होता जगातील मोठा ‘जादूचा बादशाह’!Pudhari File Photo

‘हा’ होता जगातील मोठा ‘जादूचा बादशाह’!

तो मृत्यूलाही चकवा देण्याच्या कलेत कुशल
Published on

न्यूयॉर्क : जगात असे काही जादूगार होऊन गेले, ज्यांची नावे अजरामर झाली आहेत. ज्याप्रमाणे भारतात पी. सी. सरकार किंवा जादूगार आनंद यांची नावे जादूच्या दुनियेत आदराने घेतली जातात, त्याचप्रमाणे पाश्चिमात्य जगात एक मोठे नाव म्हणजे हॅरी हुडिनी : एक असा जादूगार, ज्याने केवळ अविश्वसनीय जादू दाखवली नाही, तर त्याने जादूच्या दुनियेला एक नवीन ओळख आणि प्रतिष्ठा दिली. तो मृत्यूलाही चकवा देण्याच्या कलेत कुशल होता. चला तर मग, जाणून घेऊया या ‘जादूच्या बादशाह’ विषयी.

हॅरी हुडिनीचं खरं नाव एरिक वाईस होतं. त्याचा जन्म हंगेरीमध्ये 24 मार्च 1874 या दिवशी झाला. गरिबीमुळे त्याचं कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालं. लहानपणी त्याने डिलिव्हरी बॉयचं काम केलं. ‘Memoirs of Robert-Houdin’ या फ्रेंच जादूगाराचं पुस्तक वाचून तो इतका प्रभावित झाला की, त्याने जादूगार बनण्याचा निश्चय केला आणि रॉबर्ट हुडिन यांच्या नावावरून आपलं नाव ‘हॅरी हुडिनी’ असं ठेवलं.

हुडिनीची खरी ओळख होती ती कोणत्याही बंधनातून सुटण्याची अद्भुत क्षमता. हातकड्या, साखळदंड किंवा बंदिस्त पेट्यांमधून तो सहज बाहेर पडायचा. असं कोणतंच कुलूप नव्हतं, जे त्याला बांधून ठेवू शकेल! पोलिस कोठडीतूनही तो लोकांच्या डोळ्यांदेखत निसटायचा. त्याचे हे ‘Escape Acts’ जगभर प्रसिद्ध झाले. हॅरी हुडिनीची खरी ओळख त्याच्या मृत्यूशी खेळणार्‍या धोकादायक स्टंटस्मुळे झाली. वेळेच्या मर्यादेत एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या सापळ्यातून वाचवण्याचे थरारक स्टंटस् तो करू लागला. याच स्टंटस्नी त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

त्याच्या एका प्रसिद्ध स्टंटबद्दल सांगितले जाते की, एकदा त्याला एका पेटीत बंद करून पाण्याखाली बुडवण्यात आले होते. त्यावेळी केवळ 57 सेकंदांत त्या पेटीतून बाहेर येऊन त्याने उपस्थित प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. कोणत्याही बंधनातून किंवा मृत्यूच्या दारातून परत येण्याची त्याची ही कलाच त्याला‘’जादूचा बादशाह’ बनवून गेली. हॅरी हुडिनी हा केवळ जादूगार नव्हता, तर एक उत्तम ‘शोमॅन’ होता. त्याने जादूच्या सादरीकरणात क्रांती आणली. त्याची अविश्वसनीय सुटका आणि धाडसी स्टंटस्मुळे तो इतिहासातील महान जादूगारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याची कहाणी आजही अनेकांना प्रेरणा देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news