

वॉशिंग्टन : आपल्याला काय खायला आवडते किंवा आपण कोणता आहार निवडतो, हे केवळ आपल्या जिभेवर किंवा इच्छेवर अवलंबून नसते. आपल्या पोटातील सूक्ष्मजीव आपल्या खाण्याच्या सवयी आणि निवडीवर थेट नियंत्रण ठेवू शकतात, असा खळबळजनक खुलासा एका ताज्या संशोधनातून झाला आहे.
अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांना असा संशय होता की, आतड्यांमधील बॅक्टेरिया अन्नाच्या निवडीवर प्रभाव टाकतात; परंतु आता पहिल्यांदाच प्रयोगाद्वारे हे सिद्ध झाले आहे. वैज्ञानिकांनी हा प्रयोग अशा उंदरांवर केला, ज्यांच्या शरीरात आधीपासून कोणतेही सूक्ष्मजीव नव्हते. या उंदरांच्या शरीरात निसर्गातील वेगवेगळ्या खाण्याच्या सवयी असलेल्या तीन प्रकारच्या रानटी उंदरांचे (शाकाहारी, मांसाहारी आणि सर्वभक्षी) सूक्ष्मजीव टोचण्यात आले. ज्या उंदरांमध्ये शाकाहारी प्राण्यांचे सूक्ष्मजीव होते, त्यांनी प्रयोगादरम्यान जास्त प्रथिने असलेल्या आहाराची निवड केली. याउलट, मांसाहारी आणि सर्वभक्षी सूक्ष्मजीव असलेल्या उंदरांनी कर्बोदके जास्त असलेला आहार निवडला. संशोधकांना असे आढळले की, पोटातील बॅक्टेरिया शरीरातील ‘ट्रिप्टोफॅन’सारख्या आवश्यक अमिनो ॲसिडस्च्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतात. हे रसायन मेंदूला अन्नाच्या निवडीबाबत संकेत पाठवते.
शाकाहारी सूक्ष्मजीव असलेल्या उंदरांच्या आतड्यांचा आकारही त्यांच्या दात्या प्राण्यांप्रमाणे बदललेला दिसला, जेणेकरून ते अन्नाचे आंबवण चांगल्या प्रकारे करू शकतील. प्राणी किंवा मानव नेमका कोणता आहार निवडतात, यामागे केवळ भूक हे एकमेव कारण नसून पोटातील ‘मायक्रोबायोम’ मोठी भूमिका बजावत असतात. हे बॅक्टेरिया (जीवाणू) स्वतःच्या फायद्यासाठी किंवा यजमान प्राण्याच्या शरीरातील पोषणाची गरज भागवण्यासाठी मेंदूला विशिष्ट प्रकारचे अन्न खाण्याचे संकेत देतात. ‘हा शोध प्राण्यांच्या उत्क्रांतीचा आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या शरीरातील सूक्ष्मजीव केवळ पचन करत नाहीत, तर ते आपली शारीरिक गरज आणि वागणूकदेखील बदलू शकतात,’ असे संशोधकांनी नमूद केले आहे.