

लंडन : दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना असते, पण ही सवय थेट हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. एका नवीन वैद्यकीय चाचणीतून असे दिसून आले आहे की, हिरड्यांच्या गंभीर आजारावर (पेरियोडॉन्टायटिस) वेळीच उपचार केल्यास हृदयाला रक्तपुरवठा करणार्या मुख्य रक्तवाहिनीची जाडी वाढण्याची प्रक्रिया मंदावते. हिरड्यांच्या आजारामुळे शरीरात निर्माण होणारी सूज कमी करून, तोंडाच्या आरोग्याची ही नियमित काळजी रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत ठेवण्याचा एक दुर्लक्षित पण प्रभावी मार्ग ठरू शकतो.
या अभ्यासाचे सह-लेखक आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील क्लिनिकल रिसर्च पेरियोडॉन्टिस्ट डॉ. मार्को ऑर्लांडी यांनी सांगितले, ‘जेव्हा मी पहिल्यांदा या संशोधनाचा डेटा पाहिला, तेव्हा मी अक्षरशः भारावून गेलो होतो.’ पेरियोडॉन्टायटिस हा हिरड्यांचा एक जुना दाहक आजार आहे. अमेरिकेतील आकडेवारीनुसार, 30 वर्षांवरील सुमारे 40 टक्के प्रौढांना कोणत्या ना कोणत्या स्तरावर हा आजार असतो. या आजारामुळे हळूहळू दात सैल होणे, दात गळणे आणि तोंडातून सतत दुर्गंधी येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
आजार जसजसा वाढत जातो, तसतसे दातांभोवती खोल खड्डे (पॉकेटस्) तयार होतात, जिथे टूथब्रश किंवा फ्लॉस पोहोचू शकत नाही आणि तिथे प्लाक व बॅक्टेरिया जमा होतात. यापूर्वीच्या अनेक संशोधनांमधून हिरड्यांच्या आजाराचा संबंध पुढील गंभीर आजारांशी जोडण्यात आला आहे : अल्झायमर रोग, कोलन कॅन्सर (मोठ्या आतड्याचा कर्करोग), संधिवात. विशेषतः हिरड्यांचा आजार आणि हृदयविकार यांच्यातील संबंधांवर मोठ्या प्रमाणात पुरावे उपलब्ध झाले आहेत.
‘युरोपियन हार्ट जर्नल’मध्ये 19 ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या या नवीन वैद्यकीय चाचणीत, शास्त्रज्ञांनी हिरड्यांचा आजार असलेल्या निरोगी प्रौढांवर उपचार केले. उपचारांनंतर त्यांच्या मानेच्या दोन्ही बाजूंना असलेल्या कॅरोटिड धमन्यांच्या आतील दोन थरांची जाडी वाढण्याचा वेग कमी झाल्याचे आढळून आले. या धमन्यांच्या भिंतींची जाडी हे हृदयविकाराच्या धोक्याचे एक प्रमुख लक्षण मानले जाते. थोडक्यात, हा अभ्यास हिरड्यांचे आरोग्य आणि हृदयाचे आरोग्य यांच्यातील संबंध अधिक स्पष्ट करतो.