Tribal Culture Research : आईची अंगाई बनली ‌‘पीएचडी‌’चा विषय!

गुजरातच्या डांगमधील आदिवासी तरुणाने जतन केली 134 दुर्मीळ अंगाई गीते
Tribal Culture Research
Tribal Culture Research
Published on
Updated on

सुरत : गुजरातच्या डांग जिल्ह्यातील अहवा जवळील पिपल्यामल गावची सोमी गवली जेव्हा आपल्या लहानग्या जितेंद्रला ‌‘हालारडा‌’ (पारंपरिक आदिवासी अंगाई गीत) गाऊन झोपवायची, तेव्हा तिला कधीच वाटले नव्हते की, तिचा मुलगा याच गीतांना एके दिवशी जगप्रसिद्ध करेल.

आज 34 वर्षीय जितेंद्र गवळी यांनी चिल्ड्रन्स रिसर्च युनिव्हर्सिटीमधून आपली पीएचडी पूर्ण केली आहे. त्यांनी दक्षिण गुजरातमधील 9 वेगवेगळ्या आदिवासी बोलीभाषांमधील 134 अंगाई गीतांचे जतन करण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. विशेष म्हणजे या अशा बोलीभाषा आहेत ज्यांना स्वतःची कोणतीही लिपी नाही आणि ज्या केवळ ऐकून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आल्या आहेत. जितेंद्र यांनी केवळ ही गीते डायरीत उतरवली नाहीत, तर प्रत्येक अंगाईचे रेकॉर्डिंग केले आहे. त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट केला असून ती गीते कोणत्या परिस्थितीत किंवा प्रसंगी गाईली जातात, याची सविस्तर माहिती दिली आहे. या संशोधनासाठी जितेंद्र यांनी डांग, वलसाड, नवसारी, भरूच, तापी आणि नर्मदा जिल्ह्यांतील अनेक गावांना भेटी दिल्या आणि आदिवासी कुटुंबांसोबत तासनतास वेळ घालवला. ज्या बोलींना लिपी नाही, अशा भाषांमधील संस्कृती जितेंद्र यांनी गुजरातीत अनुवादित करून जिवंत ठेवली आहे. त्यांच्या संशोधनानुसार, अंगाई गीते मुलांच्या मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे मुले आवाज ओळखणे, शब्द समजून घेणे आणि संगीताचा ताल पकडणे शिकतात. या आदिवासी समुदायांमध्ये केवळ माताच नाही, तर पुरुषही मुलांना अंगाई ऐकवतात. या गीतांमध्ये निसर्ग, शौर्य, प्रेम आणि विनोदाचे किस्से असतात, ज्यामुळे मुले आपल्या संस्कृतीशी जोडली जातात. जितेंद्र यांचे आई-वडील अशिक्षित असून शेती करतात. मात्र, अत्यंत गरिबीतही त्यांनी मुलाचे शिक्षण कधीही थांबू दिले नाही. सोमी गवळी अभिमानाने सांगतात की, ‌‘आमच्या मुलाने स्वतःच्या आदिवासी संस्कृतीवर संशोधन केले, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. तो आमच्या संपूर्ण गावातील पहिला ‌‘पीएचडी‌’ धारक आहे.‌’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news