Guinea Pig Race | गिनी पिग्सची शर्यत, ब्यूटी कॉन्टेस्ट

Guinea Pig Race |
Guinea Pig Race | गिनी पिग्सची शर्यत, ब्यूटी कॉन्टेस्ट
Published on: 
Updated on: 

लंडन : सर्वसाधारणपणे गिनी पिगकडे लोक घरात पाळले जाणारे लहान पाळीव प्राणी म्हणून पाहतात. मात्र, बोलिव्हियामध्ये त्यांच्यासंदर्भात घडलेला एक अनोखा सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. येथे गिनी पिग्ससाठी खास शर्यत, ब्यूटी कॉन्टेस्ट आणि वजनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या फेस्टिव्हलमध्ये काही गिनी पिग वेगाने धावताना दिसले, तर काहींची त्यांच्या वजनाच्या आधारे पारख करण्यात आली. एवढेच नव्हे, तर एक रॅम्प शोही आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सर्वात स्टायलिश गिनी पिगची निवड करण्यात आली. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह बोलिव्हियातील स्थानिक शेतकरीही सहभागी झाले होते.

हा कार्यक्रम बोलिव्हियातील एल आल्टो शहरात आयोजित करण्यात आला होता. तेथील ‘पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ एल आल्टो’च्या ॲनिमल सायन्स आणि लाईव्हस्टॉक कार्यक्रमाशी जोडलेल्या विद्यार्थ्यांनी याचे आयोजन केले होते. स्पर्धेत २.५ किलो वजन असलेल्या गिनी पिगची सर्वाधिक चर्चा रंगली. हे गिनी पिग एल आल्टो येथील कल्लुटाका फार्मवरून आणले होते. त्याला सर्वात वजनदार गिनी पिगचा किताब मिळाला. तर शर्यतीत दुसऱ्या फार्मवरून आलेल्या एका गिनी पिगने सर्वात वेगवान धावत पहिला क्रमांक पटकावला. बोलिव्हिया आणि अँडीज पर्वतरांगेच्या इतर भागांमध्ये गिनी पिगला ‘कुई’ म्हटले जाते. येथे ते पाळण्याची परंपरा हजारो वर्षे जुनी आहे. प्राचीन काळात अँडीज संस्कृतीतील लोक याचा वापर केवळ अन्नासाठीच नव्हे, तर धार्मिक आणि पारंपरिक विधींमध्येही करत असत. अनेक समुदायांमध्ये कुईला खास महत्त्व दिले जात होते. सामूहिक मेजवान्यांमध्ये ते वाढले जात असे आणि पाहुण्यांसमोर ठेवणे हा सन्मान व आदरातिथ्याचे प्रतीक मानले जात असे. काही पारंपरिक समजुतींनुसार शरीरातील तक्रारी आणि ऊर्जेशी संबंधित समस्या शोधण्यासाठीही याचा वापर केला जात असे. या फेस्टिव्हलमागे स्थानिक शेतकऱ्यांना गिनी पिग पालनासाठी प्रोत्साहन देणे हाही एक मोठा उद्देश होता. जर लोकांनी ते खाण्यात आणि पाळण्यात पुन्हा रस दाखवला, तर ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग खुला होऊ शकतो, असे आयोजकांना वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.