मांगल्यदायी गुढीपाडवा

मराठी नववर्षातील पहिला सण
Gudi Padwa
Gudi Padwa
Published on
Updated on

सुनील कुलकर्णी, आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक म्हणून गुढीपाडव्याला वेगळे महत्त्व आहे. बह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली, भगवान विष्णूंनी शंकासुराचा वध करण्यासाठी मत्स्यरूपी अवतार घेतला, प्रभू श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तो गुढीपाडव्याचाच दिवस, असे मानले जाते.

हिंदू संस्कृती ही उत्सवप्रिय म्हणून जगभरात ओळखली जाते. चैत्र महिन्यामध्ये येणारा गुढीपाडवा हा मराठी नववर्षातील पहिला सण. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला म्हणजेच ज्या दिवशी नवीन चंद्राचे दर्शन होते, त्या दिवशी घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा होतो. यंदा प्रतिपदा तिथी 19 मार्च रोजी सकाळी 6.52 वाजता सुरू होईल आणि 20 मार्च रोजी पहाटे 4.52 वाजता समाप्त होईल.

‌‘गुढीपाडवा‌’ या शब्दाचा अर्थ आणि त्यामागचे शास्त्र समजून घेणे रंजक आहे. ‌‘पाडवा‌’ म्हणजे चांद्रमासातील पंधरवड्याचा पहिला दिवस, तर ‌‘गुढी‌’ म्हणजे बांबूच्या काठीला सजवून तयार केलेली विजयपताका. या दिवशी घराची स्वच्छता करून उंबरठ्यावर रांगोळी काढली जाते आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. यानंतर सुस्नात होऊन गुढी तयार करताना एका उंच बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, फुलांचे हार, कडुनिंबाची आणि आंब्याची पाने, साखरेच्या गाठी बांधल्या जातात आणि त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या उलटा ठेवला जातो. घराच्या उजव्या बाजूला ही गुढी उंच ठिकाणी उभारली जाते, जेणेकरून ती दुरुनही दिसावी. ही गुढी घरात सौभाग्य घेऊन येते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करते, अशी धारणा आहे.

गुढीमधील प्रत्येक घटकाला एक विशिष्ट अर्थ आहे. गुढीतील पिवळा रंग हा सत्त्वगुणांचे प्रतीक असून तो नकारात्मक शक्तींचा नाश करतो, तर हिरवा आणि केशरी रंग हे जीवन आणि पवित्र अग्नीचे प्रतिनिधित्व करतात. गुढीला बांधलेली आंब्याची पाने ही अमरत्वाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जातात, तर लाल रंगाची फुले ही नकारात्मकतेविरुद्ध लढण्याची तीव इच्छाशक्ती दर्शवतात. साखरेच्या गाठी आयुष्यातील गोडव्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे गुढीपाडवा हा सण परंपरा, निसर्ग चक्र आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारा एक महान संस्कार आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभी जुन्या वाईट विचारांचा त्याग करून, नव्या उमेदीने आणि सकारात्मकतेने जीवनाची सुरुवात करण्याचा संदेश हा सण देतो. पौराणिक कथांनुसार, बह्मदेवांनी चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीच या विश्वाची निर्मिती केली. सत्यायुगाचा प्रारंभ आणि कालगणनेची सुरुवात याच मुहूर्तावर झाली, अशी मान्यता आहे. या सृष्टीचा आणि काळाचा आदर करण्यासाठी या दिवशी ‌‘बह्मध्वज‌’ म्हणजेच गुढी उभारली जाते. हा ध्वज विजयाचे आणि नवनिर्माणाचे प्रतीक मानला जातो. या ध्वजाला वंदन करणे म्हणजे अस्तित्वाचा उगम असलेल्या त्या परमशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय.

वाल्मीकी रामायणानुसार, प्रभू श्रीरामांनी लंकापती रावणाचा पराभव करून 14 वर्षांचा वनवास संपवला आणि याच दिवशी ते अयोध्येत परतले. ते अयोध्येच्या सीमेवर पोहोचले तेव्हा संपूर्ण अयोध्यानगरीतील प्रजेने रामरायाचे स्वागत करण्यासाठी घराघरासमोर उंच ध्वज आणि पताका उभारल्या. यालाच ‌‘विजयपताका‌’ किंवा ‌‘गुढी‌’ असे संबोधले जाते. त्याअर्थाने गुढी ही विजयश्रीचे प्रतीक आहे. वाईटावर चांगल्याचा विजय हे त्यातील मर्म आहे. गुढीपाडवा हाच संदेश आपल्याला देतो. मनातील नकारात्मकता, ईर्ष्या, लोभ, मत्सर, दैन्य, निराशा, वासना, राग यांसारख्या अवगुणांचा, अपप्रवृत्तींचा पराभव करून सन्मार्ग, सत्कार्य, सद्विचार आणि सकारात्मकतेची कास धरल्यास यश निश्चित मिळते, हा त्यातील मथितार्थ आहे. आकाशाला स्पर्श करणाऱ्या गुढीप्रमाणे आपली स्वप्ने आणि ध्येयेही उत्तुंग असावीत. ती पूर्ण करण्यासाठी सृष्टीनिर्मात्या बह्मदेवापासून प्रभूरामचंद्रांपर्यंत सर्वांचे आशीर्वाद लाभावेत, अशी मनोभावना गुढीला वंदन करताना असायला हवी.

चैत्र महिना येतो तो मुळी सृष्टीचा बहर घेऊनच! या महिन्यापासूनच ऋतुराज वसंताचे आगमन होते. संपूर्ण सृष्टी जणू नवा जन्म घेऊन बहरलेली असते. वृक्ष-वेलींना पालवी फुटलेली असते. हिरव्या रंगाच्या पानांच्या रंगीबेरंगी फुलांच्या मोहक छटा सर्वत्र दिसत असतात. सृष्टी जणू सारे वैभव मुक्तहस्ताने उधळत असते. या महिन्याला ‌‘चैत्र‌’ हे नाव ‌‘चित्रा‌’ नक्षत्रावरून पडले. कारण, या महिन्यात येणारी पौर्णिमा चित्रा नक्षत्रावर येते. चैत्र हा शब्द ‌‘चित‌’ या संस्कृत शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ विविधता. या कालावधीत सृष्टीने जणू विविधतेचा ध्यासच घेतलेला असतो. ती विविध रूपांत नटलेली असते. या सृष्ट रूपाची आठवण म्हणूनही या महिन्याला चैत्र असे म्हणतात.

गुढीपाडवा हा सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये प्रादेशिक विविधताही पाहायला मिळते. गोव्यात याला ‌‘संवत्सर पाडवो‌’ म्हणतात, तर कर्नाटक आणि आंध प्रदेशात ‌‘उगादी‌’ या नावाने हा दिवस साजरा होतो. या दिवशी कडुनिंबाची पाने आणि गूळ यांचे मिश्रण प्रसाद म्हणून ग््राहण करण्याची प्रथा आहे. हे केवळ शरीराच्या शुद्धीकरणासाठीच नाही, तर जीवनातील सुख आणि दुःख, यश आणि अपयश या दोन्ही अनुभवांना समानतेने स्वीकारण्याचे प्रतीक आहे. या मंगलदिनी घराघरांत पुरणपोळी, बासुंदी आणि श्रीखंडासारखे गोड पदार्थ बनवले जातात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हा दिवस कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, व्यवसायाचा प्रारंभ करण्यासाठी, वास्तुशांतीसाठी किंवा सोने-चांदी आणि नवीन वाहन खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

महाराष्ट्रात आपण शालिवाहन शके पद्धती कालगणनेसाठी वापरतो, ती याच दिवसापासून सुरू होत असते. शालिवाहन राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग, या सैन्यांच्या मदतीने शत्रूंचा पराभव केला, अशी मान्यता आहे. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडव्यापासून चैत्री नवरात्रास प्रारंभ होतो. या दिवसांमध्ये आदिशक्तीची पूजा केली जाते. देवीच्या वेगवेगळ्या शक्तिपीठांच्या स्थानी मोठा उत्सव साजरा केला जातो, यात्रा भरते. दूरदूरहून भक्तगण मातेच्या दर्शनासाठी येतात. चैत्र पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो. घराघरांतून चैत्रागौरीची स्थापना होते. सुवासिनींना हळदी-कुंकू दिले जाते. कैरीचे पन्हे, कैरीची डाळ प्रसाद म्हणून दिला जातो. असा हा नवचैतन्याचा संदेश देणारा गुढीपाडवा सृष्टीच्या सर्जनतेचं दर्शन घडवणारा असतो. पौराणिक कथांमधील संदर्भांचे सार काढल्यास गुढीपाडवा हा विजयोत्सवाचा, चैतन्याचा, आनंदाचा दिवस आहे आणि गुढी ही शौर्याचे, विजयाचे, आनंदाचे प्रतीक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news