धगधगत्या लाव्हावर तयार होतो हा खतरनाक पिझ्झा!
ग्वाटेमाला : आपण आजवर पिझ्झा बराच खाल्ला असेल. यातील काही पिझ्झा पॅनवर केलेले असतील तर काही ओव्हनमध्ये. मात्र, आज आपण ज्या पिझ्झाबाबत जाणून घेणार आहोत, तो या जगातील सर्वात खतरनाक पिझ्झा म्हणूनच ओळखला जातो. याचे कारण म्हणजे हा पिझ्झा कोणत्याही पॅनमध्ये किंवा ओव्हनमध्ये नव्हे तर चक्क धगधगत्या लाव्हावर तयार केला जातो.
वास्तविक, खाण्यापिण्याचे शौकिन टेस्टी फूड कुठे मिळते, याची उत्तम माहिती घेऊन असतात. पोट भरेल आणि मनही भरेल, अशा पदार्थांच्या शोधात ते असतात. पण, काही खवय्ये असेही असतात, ज्यांना खाण्याबरोबरच साहसी जागांवर जाऊन तेथे त्या पदार्थांचा मनसोक्त आनंद घेण्याचा शौक असतो. आता असाच शौक पूर्ण करण्याची अनोखी जागा म्हणजे ग्वाटेमाला. येथे मारियो डेव्हिड ग्रासिया नावाचा शेफ थेट ज्वालामुखीवर पिझ्झा तयार करुन ते खवय्यांना अतिशय प्रेमाने सर्व्ह करतात. ग्रासिया असे सांगतात की, त्यांनी अनेक प्रकारचे पदार्थ तयार करुन त्याची विक्री केली. पण, लाव्हावर तयार होणार्या पिझ्झाइतका प्रतिसाद आणखी कुठेच मिळाला नाही.
शेफ ग्रासिया ज्वालामुखीच्या गरम राखेवर ठेवून हा पिझ्झा तयार करतात. खरं तर या पिझ्झाला विषारी गॅस व तेथील खराब एअर क्वॉलिटीचा दर्प येतो. सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण बरेच असल्याने ज्वालामुखी फुटत असताना येथील वातावरणात बराच गॅस असतो. त्यामुळे येथील हवाही खराब राहते, पण तरीही अनेक जण येथे येऊन येथील लाव्हा पिझ्झाचा खात असतात. वाचून आश्चर्य वाटेल, पण ज्वालामुखीच्या पायथ्याशी बसून येथे पिझ्झाचा आनंद घेणे आता ग्वाटेमाला पर्यटनाचा एक अविभाज्य घटकच बनत चालला आहे. येथे पर्यटक येऊन सक्रिय लाव्हारसासमोर बसून पिझ्झाचा आनंद लुटतात. या ज्वालामुखीचे नाव ‘पकाया’ असे आहे. मे 2021 मध्ये या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. ग्वाटेमालात एकूण तीन ज्वालामुखी सक्रिय असून त्यात ‘पकाया’ या ज्वालामुखीच्या गरम राखेवर हा पिझ्झा तयार केला जातो आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचीही येथे बरीच रेलचेल असते!

