

नवी दिल्ली : सोलो ट्रॅव्हलिंग म्हणजे केवळ फिरणे नव्हे, तर स्वतःला नव्याने ओळखण्याची आणि स्वतःच्या सोबतीचा आनंद घेण्याची एक संधी असते. भारतात विशेषतः महिलांमध्ये हा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे. आज महिला निर्भीडपणे एकट्याने नवनवीन ठिकाणे शोधत आहेत. अशा परिस्थितीत, कोणती ठिकाणं केवळ सुंदरच नाहीत, तर सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
भारतातील अनेक हिल स्टेशन्स आणि ऐतिहासिक स्थळं याबाबतीत महिलांसाठी अगदी योग्य ठरतात. जिथे निसर्गसौंदर्य मन मोहून टाकते आणि वातावरण तुम्हाला कोणत्याही तणावाशिवाय फिरण्याचे स्वातंत्र्य देते. चला, जाणून घेऊया भारतातील अशाच सर्वोत्तम ठिकाणांबद्दल. एकट्या प्रवासासाठी ही सर्वोत्तम ठिकाणे आहेत.
ऋषीकेश (उत्तराखंड) : अध्यात्म आणि साहसाचा संगम महिला सोलो ट्रॅव्हलर्सच्या यादीत ऋषीकेशचे स्थान नेहमीच अव्वल असते. ही एक अध्यात्मनगरी आहे, जिथे त्रिवेणी घाटावरील गंगा आरती मनाला शांती देते. हा अनुभव एकट्या प्रवास करणार्या कोणत्याही महिलेसाठी अविस्मरणीय ठरतो. तुम्हाला साहसाची आवड असेल, तर रिव्हर राफ्टिंग, जंगल ट्रेक यांसारखे पर्याय तुमचा प्रवास आणखी रोमांचक बनवतात.
आयझॉल (मिझोराम) : सुरक्षित आणि सुंदर राजधानी मिझोरामची राजधानी असलेले आयझॉल हे शहर आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. उंच डोंगरांगांवर वसलेले हे शहर संस्कृती, खाद्यपदार्थ आणि परंपरेसाठी ओळखले जाते. महिलांसाठी हे शहर अत्यंत सुरक्षित असून, येथील वातावरण शांत आणि मैत्रीपूर्ण आहे.
कुर्ग, (कर्नाटक) : भारताचे स्कॉटलंड कर्नाटकमधील प्रसिद्ध हिल स्टेशन असलेले कुर्ग हे महिलांच्या सोलो ट्रॅव्हलसाठी एक उत्तम ठिकाण आहे. ‘भारताचे स्कॉटलंड’ म्हणून ओळखल्या जाणार्या या जागेची दाट हिरवळ, कॉफीचे मळे, शांत वातावरण आणि सुंदर धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.
हंपी (कर्नाटक) : इतिहासाच्या पाऊलखुणा हंपी हे एक असे ठिकाण आहे, जिथे इतिहासाच्या पाऊलखुणा जागोजागी दिसतात. येथील भव्य दगड, प्राचीन मंदिरे आणि शांत वातावरण एकट्याने फिरण्यासाठी उत्तम आहेत. येथे तुम्ही विजयनगर साम्राज्याचे अवशेष पाहू शकता आणि इतिहासाशी एकरूप होऊ शकता.
कोडाईकनाल (तामिळनाडू ) : डोंगरांची राजकुमारी ‘डोंगरांची राजकुमारी’ म्हणून ओळखले जाणारे कोडाईकनाल हे तामिळनाडूमधील एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथील थंड, धुक्याने वेढलेले हवामान, हिरवीगार जंगले, वळणदार डोंगर आणि कोडाई तलाव याला खास बनवतात.
गंगटोक (सिक्कीम) : शांत आणि मनमोहक सिक्कीमची राजधानी असलेले गंगटोक हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. हे शहर महिला प्रवाशांसाठी अत्यंत सुरक्षित मानले जाते आणि येथील लोक खूप स्वागतशील आहेत. त्सोमो तलाव, नाथुला पास आणि विविध मठ येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
शिलाँग (मेघालय) : संगीत, कॅफे आणि सुरक्षितता शिलाँग हे महिलांसाठी एक सुरक्षित, शांत आणि आकर्षक हिल स्टेशन आहे. येथील स्वच्छ रस्ते, मैत्रीपूर्ण लोक, चांगले कॅफे आणि सहज उपलब्ध सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे हे ठिकाण सोलो महिला प्रवाशांसाठी आरामदायी ठरते.
अल्मोडा (उत्तराखंड) : निसर्गरम्य आणि शांततापूर्ण अल्मोडा हे एक अत्यंत शांत, सुरक्षित आणि सुखद अनुभव देणारे हिल स्टेशन आहे. कुमाऊँच्या टेकड्यांमध्ये वसलेले हे शहर मंदिरे, पाईनची जंगले आणि सुंदर सूर्योदयासाठी ओळखले जाते. येथे गर्दी कमी असल्याने शांतता अनुभवता येते.
कलिम्पॉन्ग (पश्चिम बंगाल) : दार्जिलिंगपेक्षा शांत पर्याय कलिम्पॉन्ग हे एक शांत आणि सुरक्षित हिल स्टेशन असून, ते दार्जिलिंगपेक्षा अधिक आरामदायी आणि कमी गर्दीचे आहे. येथील मठ, फुलांच्या नर्सरी आणि सुंदर डोंगररांगांचे द़ृश्य याला महिला सोलो ट्रॅव्हलर्ससाठी एक उत्तम पर्याय बनवतात.