Snowfall: वऱ्हाड निघालंय बर्फातून!

मंडी जिल्ह्यातील सराज विधानसभा क्षेत्रात एका नवरदेवाने चक्क सात किलोमीटर बर्फातून पायपीट करत लग्नस्थळ गाठले.
Snowfall
Snowfall: वऱ्हाड निघालंय बर्फातून!Pudhari
Published on
Updated on

सिमला : हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या तुफानी हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही एका नवरदेवाने दाखवलेल्या हिमतीची आणि परंपरेची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगली आहे. मंडी जिल्ह्यातील सराज विधानसभा क्षेत्रात एका नवरदेवाने चक्क सात किलोमीटर बर्फातून पायपीट करत लग्नस्थळ गाठले.

मंडी जिल्ह्यातील केओली पंचायतीच्या बुनालीधार गावातील गितेश ठाकूर आणि भैंचडी गावातील उषा ठाकूर यांचा विवाह 24 जानेवारी रोजी निश्चित झाला होता. मात्र, लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे 23 जानेवारीला भागात प्रचंड हिमवृष्टी झाली. दोन्ही गावांमध्ये सुमारे 3 ते 4 फूट बर्फ साचला, रस्ते बंद झाले आणि चालण्याचे मार्गही बर्फाच्या जाड थराखाली गाडले गेले. स्थानिक रीतीरिवाजांनुसार ठरलेली लग्नाची तिथी बदलणे अशुभ मानले जाते. हीच परंपरा जपण्यासाठी नवरदेव गितेश आणि वऱ्हाडी डगमगले नाहीत. नवरदेव आणि वऱ्हाडी बुनालीधार गावातून पायी निघाले. गुडघाभर बर्फातून वाट काढत त्यांनी 7 किलोमीटरचे अंतर पार केले. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना सुमारे 3 ते 4 तास लागले. लग्न लागल्यानंतर नवरीला सासरी नेण्याचे मोठे आव्हान होते.

डोंगराळ भागात पालखीची परंपरा असते; पण निसरड्या वाटांमुळे पालखी नेणे धोकादायक होते. त्यामुळे नवरी उषा ठाकूर यांनीही कोणताही धोका न पत्करता वऱ्हाडासोबत 7 किलोमीटर पायी चालण्याचा निर्णय घेतला. हाडे गोठवणाऱ्या थंडीत आणि चहूबाजूंनी असलेल्या बर्फाच्या पांढऱ्या चादरीत हा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर नवरीने नवरदेवाचा हात धरून बर्फाळ वाटांवरून चालत आपल्या सासरी प्रवेश केला. येण्या-जाण्याचा मिळून हा एकूण 14 किलोमीटरचा प्रवास या जोडप्यासाठी आणि वऱ्हाड्यांसाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा ठरला आहे. या अनोख्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रतिकूल परिस्थितीतही परंपरा जपणाऱ्या या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news