

टोकियो : अकाली केस पांढरे होणे हे एक संकेत असू शकते की शरीर प्रभावीपणे कर्करोगापासून आपले संरक्षण करत आहे, असे एका नवीन अभ्यासातून सूचित होते. संशोधकांना आढळले आहे की, अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) प्रकाश किंवा काही रसायने यांसारख्या कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक शरीरातील एका नैसर्गिक संरक्षण मार्गाला सक्रिय करतात. हा मार्ग अकाली केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरतो, पण त्याचबरोबर कर्करोगाचा धोकाही कमी करतो.
या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी केसांना रंग देणारे रंगद्रव्य तयार करणार्या मूल पेशींचा मागोवा घेतला. उंदरांवर केलेल्या प्रयोगात त्यांना आढळले की, डीएनएचे नुकसान झाल्यावर या पेशी दोनपैकी एक प्रतिसाद देतात: एकतर त्या वाढणे आणि विभाजित होणे थांबवतात, ज्यामुळे केस पांढरे होतात किंवा त्या अनियंत्रितपणे विभाजित होऊन गाठी (ट्युमर) तयार करतात. नेचर सेल बायोलॉजी या जर्नलमध्ये ऑक्टोबरमध्ये प्रकाशित झालेल्या या निष्कर्षांवरून असे दिसून येते की, डीएनएचे नुकसान आणि रोगांपासून संरक्षण म्हणून वाढत्या वयानुसार विकसित होणार्या या संरक्षण यंत्रणांचे मोठे महत्त्व आहे.
निरोगी केसांची वाढ ही केसांच्या कूपामध्ये सतत स्वतःचे नूतनीकरण करणार्या मूल पेशींच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. या कूपामध्ये मेलानोसाइट स्टेम पेशींचा साठा असतो, या पेशी मेलेनिन रंगद्रव्य तयार करतात, ज्यामुळे केसांना रंग येतो. सिटी सेंट जॉर्ज, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथील पेशी जीवशास्त्रज्ञ डॉट बेनेट यांनी स्पष्ट केले की, ‘प्रत्येक केस चक्राच्या वेळी, या मेलानोसाइट स्टेम पेशी विभाजित होतात आणि काही परिपक्व पेशी तयार करतात.
या पेशी केसांच्या कूपामध्ये खाली स्थलांतरित होतात आणि केसांमध्ये रंग भरण्यासाठी रंगद्रव्य बनवण्यास सुरुवात करतात.’ जेव्हा या पेशी प्रत्येक केसांच्या तंतूंना पूर्णपणे रंग देण्यासाठी पुरेसा रंग तयार करू शकत नाहीत, तेव्हा केस पांढरे होऊ लागतात. बेनेट यांनी याला ‘पेशी वृद्धत्व’ म्हणून संबोधले. ‘हे एक प्रकारचे थकवा असून, पेशी किती वेळा विभाजित होऊ शकतात यावरची मर्यादा आहे. ही एक कर्करोग विरोधी यंत्रणा असल्याचे दिसते, ज्यामुळे कालांतराने जमा झालेले याद़ृच्छिक जनुकीय दोष अनियंत्रितपणे वाढू शकत नाहीत.’