

नवी दिल्ली : हिवाळा सुरू झाला की, बाजारात ठिकठिकाणी ताज्या आणि रसरशीत हिरव्या वाटाण्यांची आवक वाढते. वाटाणा केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर तो आरोग्याचा खजिनाही मानला जातो. थंडीच्या दिवसांत वाटाण्याचे सेवन केल्याने शरीराला ऊब मिळते आणि अनेक आजारांपासून संरक्षण होते. हिरव्या वाटाण्यामध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हिवाळ्यात हिरव्या वाटाण्यांचे सेवन अनेक बाबतीत लाभदायक ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.
थंडीत वारंवार होणारे सर्दी-खोकल्यासारखे संसर्ग रोखण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. हिरव्या वाटाण्यात मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. हिवाळ्यात अनेकदा पचनाच्या समस्या जाणवतात. वाटाण्यामध्ये असलेल्या उच्च फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट साफ राहण्यास मदत मिळते. वाटाण्यामध्ये शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात. यात असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब संतुलित ठेवतात, ज्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका टळतो.
वाटाणा हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे आणि यात फॅटस्चे प्रमाण अत्यंत कमी असते. वाटाणे खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे सारखी भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित ठेवणे सोपे जाते. थंडीच्या दिवसांत सांधेदुखीचा त्रास अनेकदा बळावतो. हिरव्या वाटाण्यात ‘व्हिटॅमिन के’ मोठ्या प्रमाणात असते, जे हाडांना मजबुती देण्यासाठी आणि हाडांची झीज रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, वाटाणा जास्त शिजवल्यास त्यातील पोषक तत्त्वे कमी होऊ शकतात. त्यामुळे तो वाफवून, सूपमध्ये टाकून किंवा कोशिंबिरीच्या स्वरूपात खाणे अधिक फायदेशीर ठरते. वाटाण्याचे अतिसेवन केल्याने काही जणांना गॅस किंवा पोटफुगीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे मर्यादित प्रमाणातच याचे सेवन करावे.