

अथेन्स : ग्रीसमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांना एका पदच्युत उमराव महिलेची कबर नुकतीच सापडली आहे, ज्याला ते ‘उलटा मुकुट असलेली महिला’ असे संबोधत आहेत. इसवी सनपूर्व सातव्या शतकातील हे दफनविशेष महत्त्वाचे आहे. कारण महिलेच्या डोक्यावर ठेवलेला विस्तृत कांस्य मुकुट उलटा ठेवलेला होता, जो तिच्या सत्तेचा अंत दर्शवतो.
ग्रीक संस्कृती मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ही उमराव महिलेची कबर पूर्व-मध्य ग्रीसमध्ये, अथेंसपासून सुमारे 60 मैल (95 किलोमीटर) वायव्येस, बांधकामादरम्यान नुकत्याच शोधलेल्या एका प्राचीन दफनभूमीत सापडली. आतापर्यंत सापडलेल्या 40 कबरी आर्चेइक आणि क्लासिकल कालखंडात (इसवी सनपूर्व 800 ते 323) मृत्यू पावलेल्या उच्च सामाजिक स्तरातील लोकांच्या आहेत असे दिसते. निवेदनानुसार, एका कबरीने इतरांपेक्षा लक्ष वेधून घेतले. मृत्यूवेळी अंदाजे 20 ते 30 वर्षे वय असलेल्या एका महिलेच्या या दफनभूमीत पुरातत्त्वशास्त्रज्ञांना अनेक कांस्य वस्तू सापडल्या, ज्यात भूमिती शैलीतील घोड्यांसह एक पिन, फुलदाणीच्या आकाराचे ताईत असलेली एक नेकलेस, हाडे आणि हस्तिदंताचे मणी, तांब्याचे कानातले, एक ब—ेसलेट आणि अनेक सर्पिल अंगठ्यांचा समावेश होता.
विशेषतः, महिलेच्या कांस्य डायडेमने (मुकुटाचा एक प्रकार) पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. या मुकुटाच्या पुढच्या भागावर एक मोठी ‘रोझेट’ (गुलाब फुलासारखी नक्षी) आणि मागील बाजूस नर आणि मादी सिंहांना समोरासमोर दर्शवणारे द़ृश्य होते. परंतु, हा मुकुट महिलेच्या डोक्यावर उलटा ठेवला गेला होता, ज्यामुळे सिंह खाली झोपलेले दिसत होते. निवेदनानुसार, सिंह हे राजेशाही सत्ता आणि अधिकाराचे प्रतीक होते. हे इसवी सनपूर्व तेराव्या शतकातील दक्षिण ग्रीक शहर मायसीनी येथील पूर्वीच्या चित्रणांमध्ये पाहिले जाऊ शकते, जेथे ‘लायन गेट’ हे राजाच्या सामर्थ्याचे शक्तिशाली प्रतीक होते. तथापि, उलटा मुकुट हे शासकाच्या राजीनामा किंवा पतनाचे प्रतीक आहे.
त्यामुळे, इसवी सनपूर्व सातव्या शतकाच्या मध्यातील सामाजिक आणि राजकीय उलथापालथीच्या काळात या महिलेने तिचे विशेषाधिकार असलेले स्थान गमावले असावे. ग्रीक इतिहासातील तो कठीण काळ इसवी सनपूर्व सहाव्या शतकाच्या सुरुवातीला लोकप्रतिनिधी सोलनच्या सुधारणांनी संपुष्टात आणला, ज्यांनी अथेनियन लोकशाहीचा पाया घातला. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना या महिलेच्या जवळ एका 4 वर्षांच्या मुलाची कबर देखील सापडली आहे. त्या मुलाला लहान ‘रोझेट’ असलेला कांस्य मुकुट घातलेला होता आणि तो याच कालखंडातील आहे. यावरून ते दोघे कोणत्या तरी प्रकारे संबंधित असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे.